सरपंचांनी गावे दलालमुक्त करावी; पोपटराव पवार यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:53 AM2019-03-13T02:53:16+5:302019-03-13T02:53:33+5:30
गावकारभाऱ्यांना दिला ग्रामविकासाचा कानमंत्र
पुणे : रेशन कार्ड, वीज जोडणी, जातीचे दाखले आदी सेवासुविधांसाठी नागरिकांची दलालांकडून आर्थिक पिळवणूक केली जाते. मात्र, सरपंचांनी या सर्व सुविधा गावात सहज उपलब्ध करून गाव दलालमुक्त करावे, असे आवाहन आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
गावच्या विकासासाठी झटणाऱ्या गावकारभाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी पोपटराव पवार बोलत होते. या वेळी पवार यांच्यासह माजी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, बीकेटी टायर्स अॅग्री सेल्सचे राज्याचे प्रमुख झुबेर शेख, डिस्ट्रीब्यूटर कंवरजितसिंग बंगा, परिमंडल चारचे पोलीस उपआयुक्त प्रसाद अक्कानवरू, अतुल मारणे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बीकेटी टायर्स हे ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक, तर पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक होते.
पवार म्हणाले, ‘गावच्या सरपंचांना गावातील बालकाच्या जन्मापासून ते आबालवृद्ध यांचा मृत्यू, अपघात, लग्न, अशा सर्वच गोष्टींत लक्ष द्यावे लागते. त्यामुळे गावातील लोकांना सरपंच आशादायक वाटला पाहिजे. त्याने गावाचा झेंडा उंचावेल असे काम करावे. तसेच नीतिमूल्यांची उभारणी करून गावाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. सरपंचांना काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, येणाºया समस्यांचा सामना करून हताश न होता, सरपंचांनी सातत्याने काम करत राहिले पाहिजे. सर्व सरपंचांनी विकासकामांबरोबरच गावाशी संपर्क ठेवावा तसेच शासनाकडून मंजूर झालेली कामे पूर्ण केल्यानंतर त्या कामाचा हिशोब द्यावा. सरपंचांनी प्रथमत: पंचायतीची कुंडली समजून घ्यावी, सरकारी योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास करण्यावर भर द्यावा. त्यामुळे सरपंच हा अभ्यासू असला पाहिजे. योजनांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्याने योग्य पद्धतीने तयार करून घ्यावीत. ग्रामसेवकांच्या मदतीने विविध योजनांचा गावाला लाभ मिळवून द्यावा. कार्यक्रमास प्रसाद अक्कानवरू यांनी मनोगत व्यक्त केले. ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, संपादक प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संपादक दीक्षित यांनी लोकमत सरपंच अॅवॉर्ड्सविषयीची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
लोकशाहीत सरपंच यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामसभेला महत्त्व आले आहे. त्यामुळे सरपंचांनी त्यांना मिळालेल्या संधीतून गावाचा अधिकाधिक विकास करावा.
- उल्हास पवार, ज्येष्ठ नेते
जवळपास अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात मान्यवरांनी गावाचा कारभार सांभाळताना काय करावे आणि काय करू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सरपंचांचा सेल्फी
‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड्स’च्या कार्यक्रमस्थळी भव्य दिव्य व्यासपीठ तयार करण्यात आले होते. हे व्यासपीठ सरपंचांनी आकर्षित करीत होते. प्रवेशद्वारासमोरच भव्य कमानीजवळच उभारण्यात आलेल्या सेल्फी वॉलजवळ सहकाºयांसोबत आलेल्या सरपंचांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
महिला सरपंचांना खुर्चीत बसू द्या
गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतींचे शहरीकरण होऊ लागले आहे. त्यामुळे शहरीकरण झालेल्या ग्रामपंचायतींच्या समस्या कशा सोडवायच्या, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत. मात्र, नागरिकांची प्राथमिकता लक्षात घेऊन सर्वांशी समन्वय साधून नागरी प्रश्न सोडविण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, दुष्काळी भागातील ग्रामपंचायत, आदिवासी ग्रामपंचायत, शहराजवळील ग्रामपंचायत या सर्वांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे लोकांशी चर्चा करून या समस्या सोडविण्यावर भर देणे गरजेचे आहे. काही वर्षांपासून महिलांना सरपंच म्हणून प्रतिनिधित्व मिळत आहे. त्यामुळे महिला सरपंचांच्या पतींनी खुर्चीत न बसता पत्नीला काम करू दिले पाहिजे. तसेच पंचायत आणि ग्रामसभेला पुढे घेऊन जायला हवे. सरपंचांना निवडून येण्यासाठी, शासकीय योजना गावात घेऊन येण्यासाठी निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांशी संघर्ष करावा लागतो. परंतु, सरपंचांनी एकदा निवडून आल्यावर झोकून काम करावे. पुन्हा सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळेतच याची खात्री देता येत नाही. तसेच सरपंच म्हणून काम केल्यानंतर पुढील काळात आमदार, खासदार पदापर्यंत पोहोचता येऊ शकते.
..तर तुम्हाला ‘सरपंच’ म्हणूनच लक्षात ठेवतील
गावाची आर्थिक उन्नती, भौगोलिक विकास, मानवी विकास करणे आणि गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा दृष्टिकोन समोर ठेवून सरपंचांनी आपल्या कार्यपद्धतीत आवश्यक बदल केले पाहिजेत. तसेच सरपंचपदाचा कार्यकाल संपला तरीही गावात तुम्हाला ‘सरपंच’ म्हणूनच ओळखले गेले पाहिजे, असे काम सर्व सरपंचांनी करण्याची गरज असल्याचे माजी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच गावातील प्रत्येक कुटुंबाला शेतीबरोबर एक जोडधंदा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दूध उत्पादन किंवा शेळीपालन हा उपयुक्त जोडधंदा आहे, असे नमूद करून चंद्रकांत दळवी म्हणाले, गावात विकासकामे करण्यासाठी शासनाच्या ९५ टक्के योजना उपयोगी पडतात. त्यामुळे पाण्याची सुविधा नसल्यास पाणलोट विकासाची कामे, भूजलपातळी वाढवून गावातील शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तसेच गावातील महिलांच्या क्रयशक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे गरजेचे आहे. गावातील नागरिकांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देऊन त्याची परतफेड करण्याकडेही लक्ष द्यावे. सरपंचांना सल्ला देताना चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘सरपंचांनी गावात १२ ते १५ तास काम केले तरीही ते कमीच आहे. गावात पाच वर्षे काम
केल्यानंतर तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले पाहिजे. तसेच त्यानंतर गावातील एक जबाबदार कार्यकर्ता आणि सन्माननीय नागरिक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाईल.
पुरस्कार स्वीकारताना सरपंच भावुक
येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध गावांतून अनेक गावकरी दाखल झाले होते. आपल्या सरपंचाने केलेल्या कामाची पावती पुरस्काराच्या माध्यमातून मिळणार असल्याने त्याच्यावर कौतुकाची थाप टाकण्यासाठी हे ग्रामस्थ आले होते.
सरपंचांबरोबर त्यांचे कुटुंबीयदेखील सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्काराची घोषणा होताच टाळ्यांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमून जात होता. केलेल्या कार्याचे कौतुक होत असल्याने पुरस्कार स्वीकारताना सरपंच भावुक झाले होते.
मिळालेल्या सन्मानामुळे सर्वजण भविष्यकाळात आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा घेऊन परतले. पुढील वर्षी आणखी चांगले काम करून पुन्हा लोकमतच्या पुरस्काराचे मानकरी व्हायला आवडेल, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
बीकेटी टायर्सकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. चांगले काम करणाºया सरपंचांना गावाचा विकास करताना अधिक प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने बीकेटी टायर्सने मुख प्रायोजकत्व स्वीकारून ‘लोकमत’च्या सहकार्याने ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड्स’ दिले आहे. तसेच बीकेटी टायर्स अंतर्गत सीएसआर अंतर्गत दीड लाख मुलींच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. त्याचप्रमाणे दीड लाख मुलांना शालेय पोषण आहार देण्याचे काम केले जाते. देशातील १३0 देशांत बीकेटी टायर्सची निर्यात होते. कबड्डी खेळास प्रसिद्धी मिळावी यासाठी आम्ही प्रो-कबड्डीला सहकार्य करत आहोत.
- झुबेर शेख, प्रमुख, बीकेटी टायर्स
अॅग्री सेल्स, महाराष्ट्र राज्य
पुणे जिल्ह्यातून उदंड प्रस्ताव आले होते. दोन वर्षांत झालेले काम ही पहिली तांत्रिक अट होती. ही अट नसेल तर अर्ज बाद ठरले. हे प्रस्ताव १३ गटांत विभागले आणि त्यातून १२ निवडले. सर्वच गावांत खूप चांगले काम दिसून आले. अनेकांनी तर स्वत:च्या गावांचा विकास ‘सोशल साईटवर’ ही सादर करणाºया सर्वांचे काम कौतुकास्पद आहे. ई-प्रशासन चालविणाºया गावांच्या संकेतस्थळांना भेटी दिल्या. अर्ज टाकून शहानिशा केली. लोकसहभाग आहे, की शाश्वत विकासाचे काम याची पडताळणी करूनच वैयक्तिक पुरस्कारांची निवड केली. निवड करणे काट्याची टक्कर होती. मात्र पारदर्शकपणे काम केले, असे परीक्षक नॅशनल फेडरेशन फॉर अर्बन बँक्स अँड के्रडिट सोसायटीचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि राज्याचे माजी कृषी आयुक्तउमाकांत दांगट यांनी सांगितले.