सरसंघचालक मोहन भागवत करणार 'दगडूशेठ'च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचे उद्घाटन

By श्रीकिशन काळे | Published: September 16, 2023 01:41 PM2023-09-16T13:41:03+5:302023-09-16T13:42:55+5:30

गणेशोत्सवात ३ ठिकाणी केंद्र व रुग्णवाहिका...

Sarsanghchalak Mohan Bhagwat will inaugurate 'Dagadusheth's Ayodhya Shri Ram temple decoration | सरसंघचालक मोहन भागवत करणार 'दगडूशेठ'च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचे उद्घाटन

सरसंघचालक मोहन भागवत करणार 'दगडूशेठ'च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचे उद्घाटन

googlenewsNext

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदा अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि.१९) सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी,  सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते. मंगळवारी (दि.१९) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून श्री हनुमानाच्या ४ मूर्ती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. सायंकाळी सजावटीचे उद््घाटन करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना  निमंत्रित केले आहे.
 
पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात आले आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस आहेत.
 
मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये ६० खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात आला आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी सजावटीचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण...
बुधवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. 

गणेशोत्सवात ३ ठिकाणी केंद्र व रुग्णवाहिका

जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र असणार आहेत. मंदिरासमोर संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर यांचे पहिले केंद्र असणार आहे. तर, बेलबाग चौकाजवळ सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी, जहांगिर  हॉस्पिटल, ससून सर्वोपचार रुग्णालय यांचे दुसरे केंद्र असेल. याशिवाय मुख्य उत्सव मंडपाच्या मागील बाजूस तिसरे केंद्र उभारण्यात येणार असून ससून सर्वोपचार केंद्र, भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल बाणेर यांचे असणार आहे.

गणेशभक्तांसाठी विमा व १५० कॅमे-यांचा वॉच

पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक १९ ते २९ सप्टेंबर पर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.

Web Title: Sarsanghchalak Mohan Bhagwat will inaugurate 'Dagadusheth's Ayodhya Shri Ram temple decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.