डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, आमदार रवींद्र धंगेकरांची ठिय्या आंदोलन करत मागणी

By नितीश गोवंडे | Published: November 29, 2023 04:05 PM2023-11-29T16:05:51+5:302023-11-29T16:11:29+5:30

मुख्य आरोपींवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे....

sasoon hospital Arrest Dr. Sanjeev Thakur, demanded MLA Ravindra Dhangekar while protesting | डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, आमदार रवींद्र धंगेकरांची ठिय्या आंदोलन करत मागणी

डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, आमदार रवींद्र धंगेकरांची ठिय्या आंदोलन करत मागणी

पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असून मुख्य आरोपींवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे. कैद्यांची बडदास्त ठेवणारे ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार, पोलिस प्रशासन यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे सांगत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांची चांगली धावपळ उडाली, अखेर पोलिस आयुक्तांनी धंगेरकांना आश्वस्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास सोपवावा...

आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना, अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी अद्याप हाती घेण्यात आली नाही. सरकारने या प्रकरणाकडे गंभीरतेने पहाणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा. या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना अद्याप अटक केली नाही. पैशांची देवाण घेवाण करणारा त्यांचा सहकारी कर्मचारी महेंद्र शेवते याला आम्ही आंदोलन इशारा दिल्यावर अटक झाली. तसेच कारागृह प्रशासनाची देखील कसून चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू...

ललित पाटील प्रकरणात सर्व दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी हवे तेवढे लक्ष घातले नाही. त्यांनी लक्ष घातले असते तर, पोलिसांनी वेळेवर तपास केला असता आणि आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. ललित पाटील हा लपूनछपून नव्हे तर उघड उघड ससून मधून ड्रग्जचा धंदा करत होता. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये पोलिसांना, सरकारी अधिकारी, डॉक्टरांना दिले आहेत. म्हणूनच संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. ललित पाटील हा गुन्हे शाखेतील एका अधिकार्‍याच्या संपर्कात होता. त्या अधिकाऱ्यासोबत तो व्हिडीओ कॉलवरून बोलायचा. याचा तपशील देखील सगळ्यांना समजला पाहिजे, असेही धंगेकर म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात विषय मांडणार...

ललिल पाटील ड्रग्ज प्रकरणाचा विषय मी हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे. यासंदर्भात विविध मागण्यादेखील करणार आहे. मात्र, मला या प्रकरणाबाबत अधिवेशनात किती बोलू देतील, याबाबत शंका आहे. पुण्यात हुक्का पार्लर, पब, बार अशा अनेक ठिकाणी राजरोसपणे गैरप्रकार सुरू आहेत. या गैरप्रकारांमुळे उद्याच्या पिढीचे मोठे नुकसान होत आहे.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासमवेत गोपाळ तिवारी, प्रवीण करपे, राजू नाणेकर, सुरेश जैन, प्रशांत सुरसे, गोपाळ आगरकर, सुरेश कांब‌ळे, संदीप मोरे, ऋषिकेश बालगुडे, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, राकेश नामेकर, गौरव बाळंदे, रिपब्लिक संघर्ष दलाचे संजय भिमाले आणि जयहींद संघटनेचे अध्यक्ष सुनील नवले यांची उपस्थिती होती.

Web Title: sasoon hospital Arrest Dr. Sanjeev Thakur, demanded MLA Ravindra Dhangekar while protesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.