नातेवाईकाला भेटायला ससूनमध्ये आला अन दुचाकी चोर बनला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:39 PM2021-11-23T12:39:05+5:302021-11-23T12:42:39+5:30
ससून परिसरातून सहा, हडपसर, निगडी, स्वारगेट तसेच सातार्यातून त्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे...
पुणे : लॉकडाऊनच्या काळात तो आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी तो ससून रुग्णालयात आला. मेन गेटसमोर लावलेल्या दुचाकीवर त्याचे लक्ष गेले. त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये पहिली दुचाकी चोरली. ही चोरी पचल्यावर त्याची हिमंत वाढत गेली आणि तो विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी चोरु लागला. बंडगार्डन पोलिसांनी या दुचाकी चोरट्याला पकडून त्याच्याकडून १३ दुचाकी हस्तगत केल्या. अख्तर चांद मुजावर (वय ४४, रा. मु. पो. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
अख्तर मुजावर हा सेटिंगचे काम करीत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम बंद होते. ऑगस्ट २०२१ मध्ये तो एका नातेवाईकाला भेटण्यासाठी ससून रुग्णालयात आला आला होता. तेव्हा त्याने येथील एक दुचाकी चोरुन नेली होती. त्यानंतर त्याने ससून रुग्णालयाबरोबरच शहरातील अन्य ठिकाणाहून दुचाकी वाहने चोरली होती.
हॉटस्पॉटवरुन चोरल्या ६ दुचाकी-
ससून रुग्णालयाच्या मेनगेटसमोरून आतापर्यंत अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटस्पॉट असलेल्या या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज गोळा केले. तेव्हा वाहन चोरी झालेल्या वेळेच्या दरम्यान, एक व्यक्ती सातत्याने जवळपासच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले. जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर पोलीस अमंलदार सुधीर घोटकुले व सागर घोरपडे यांना अख्तर मुजावर यानेच दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्याने चोरलेल्या १३ दुचाकी काढून दिल्या.
ससून परिसरातून सहा, हडपसर, निगडी, स्वारगेट तसेच सातार्यातून त्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, मोहन काळे, अमंलदार फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, अनिल वणवे यांनी ही कारवाई केली.
ससूनमध्ये वारंवार दुचाकीच्या चोरीच्या घटना घडत असल्याने तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गुन्ह्यात एकच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. त्याने ह्या दुचाकी राहत्या घरा जवळ आणि हॉटेलच्या परिसरात पार्क करून ठेवल्या होत्या. त्याच्याकडे गाड्यांची कागदपत्रे नसल्याने त्याला या गाड्या विकता आल्या नाही.
-सागर पाटील, पोलिस उपायुक्त