ससूनच्या बाह्यरुग्ण विभागांचे होणार एकत्रीकरण; हेलपाटे वाचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:19 AM2018-04-07T03:19:05+5:302018-04-07T03:19:05+5:30
ससून रुग्णालयामध्ये विखुरलेले विविध बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आता एकाच ठिकाणी आणले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना विविध विभागांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. तसेच ‘हायटेक कॅज्युएल्टी’च्या माध्यमातून एकाच छताखाली आवश्यक तपासण्या करण्याचे नियोजन आहे.
पुणे - ससून रुग्णालयामध्ये विखुरलेले विविध बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आता एकाच ठिकाणी आणले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना विविध विभागांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. तसेच ‘हायटेक कॅज्युएल्टी’च्या माध्यमातून एकाच छताखाली आवश्यक तपासण्या करण्याचे नियोजन आहे. ओपीडी आणि हायटेक कॅज्युएल्टी एकाच छताखाली येणार असल्याने रुग्णांना उपचाराच्यादृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
मागील काही वर्षांपासून ससून रुग्णालयामध्ये रुग्णांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. बाह्यरुग्ण विभागासह दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यापार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्या बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज सरासरी अडीच हजार रुग्ण येतात. मात्र, रुग्णालयामध्ये बहुतेक बाह्यरुग्ण विभाग विखुरलेले आहेत. काही विभाग तळमजला, काही विभाग पहिला मजला, दुसरा मजला असे ठिकठिकाणी आहेत. तळमजल्यावर नोंदणी केल्यानंतर रुग्ण संबंधित विभागामध्ये जाऊन तपासणी करतात. तेथे अन्य आजारासाठी दुसºया विभागात जाण्यास सांगितल्यास संबंधित विभागाचा शोध घेण्यापासून रुग्णाला सुरुवात करावी लागते. त्यामुळे रुग्णांना त्रास होण्याबरोबरच वेळही खूप जातो.
यावर तोडगा काढण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आता सर्व बाह्यरुग्ण विभाग तळमजला व पहिल्या मजल्यावर एकाच ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोविकार, त्वचा, बालरोग, दंत, कान-नाक-घसा, नेत्ररोग यांसह विविध विभाग एकाच ठिकाणी होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या मजल्यावर पुढील १० दिवसांत हे विभाग सुरू होतील. तर दुसºया टप्प्यात तळमजल्यावरील विभाग लवकरच सुरू केले जातील. त्यामध्ये मेडिसिन, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, मेंदूविकार, पोटाचे विकार या विभागांचा समावेश आहे. हे सर्व विभाग एकत्रित होणार असल्याने रुग्णांना विविध विभागांमध्ये जाण्यासाठी फेºया माराव्या लागणार नसून वेळही वाचणार आहे.
हायटेक कॅज्युएल्टी
सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, छोट्या शस्त्रक्रिया विभाग एकाच ठिकाणी तळमजल्यावर सुरू केले जाणार आहे. सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.
या विभागात रुग्ण आल्यानंतर ‘गोल्डन अवर’ म्हणजे सुरुवातीच्या काही काळात रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देणे शक्य होणार आहे. रुग्णांच्या संबंधित तपासण्या तातडीने होऊन रुग्णांवर आवश्यकतेनुसार तातडीने उपचार करणे शक्य होईल.
रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. रुग्णकेंद्री ससून होण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एकाच छताखाली सर्व बाह्यरुग्ण विभाग आणले जाणार आहेत. रुग्णांना उपचाराच्या दृष्टीने हे चांगले पाऊल ठरेल.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय