ससूनच्या 'कोविड' रुग्णालयाला अखेर मुहूर्त; उद्यापासून रुग्ण होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:20 PM2020-04-11T20:20:44+5:302020-04-11T20:30:51+5:30
ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील कक्षासह नायडू रुग्णालयावर येणारा ताणही कमी होणार
पुणे : ससून रुग्णालयाच्या ११ मजली नवीन इमारतीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवार (दि. १२) पासून या इमारतीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यास सुरूवात केली जाणार आहे. तर अतिदक्षता विभाग सोमवार (दि. १२) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील कक्षासह नायडू रुग्णालयावर येणारा ताणही कमी होणार आहे.
मागील जवळपास १२ वर्षांपासून ससून रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारणीची काम सुरू आहे. निधीअभावी हे काम रखडले आहे. पण कोरोनामुळे या इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने पावले उचलली. त्यानुसार इमारतीमध्ये आवश्यक सुविधा तातडीने निर्माण करण्यास सुरूवात झाली. तसेच हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून निश्चित करण्यात आले. त्यानुसार या रुग्णालयामध्ये केवळ कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तसेच अतिदक्षता विभाग उभारण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. सुरूवातीला या इमारतीमध्ये फ्लु ओपीडी सुरू करण्यात आली. पण प्रत्यक्ष रुग्ण दाखल केले जात नव्हते. सुविधा उभारण्याला विलंब होत असल्याने अखेर जुन्या इमारतीतील २७ क्रमांकाच्या वॉर्डमधील टीबीच्या रुग्णांना हलवून तिथे कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर वॉर्ड क्रमांक २८ ताब्यात घेण्यात आला. सध्या या दोन्ही वॉर्डमध्ये ४० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.
नवीन इमारतीमध्ये सध्या ५० बेडचा अतिदक्षता विभाग व १०० बेडचा विलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहे. रविवारी दुपारनंतर विलगीकरण कक्षामध्ये संशयित रुग्णांना दाखल करण्यास सुरूवात केली जाणार आहे. तर कोरोना लागण झालेल्या रुग्णांना सोमवारपासून अतिदक्षता विभागात दाखल केले जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार बेडची संख्या वाढविली जाणार आहे. या इमारतीत केवळ कोरोनाबाधित व संशयित रुग्ण असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी याला दुजोरा दिला.
----------------