परिचारिकेची वेशभूषा करून ससून रुग्णालयातून तीन महिन्यांचे बाळ पळविले; आरोपी महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:10 AM2021-09-11T04:10:39+5:302021-09-11T04:10:39+5:30

पुणे : परिचारिकेची वेशभूषा करून ससून रुग्णालयातून तीन महिन्यांच्या बाळाला पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ९ ...

Sassoon disguised as a nurse and abducted a three-month-old baby from the hospital; Accused woman arrested | परिचारिकेची वेशभूषा करून ससून रुग्णालयातून तीन महिन्यांचे बाळ पळविले; आरोपी महिलेला अटक

परिचारिकेची वेशभूषा करून ससून रुग्णालयातून तीन महिन्यांचे बाळ पळविले; आरोपी महिलेला अटक

googlenewsNext

पुणे : परिचारिकेची वेशभूषा करून ससून रुग्णालयातून तीन महिन्यांच्या बाळाला पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. रिक्षाचालकाच्या मदतीमुळे आरोपी महिलेला अटक करण्यात यश मिळाले आणि बाळ आईच्या हातात सुखरूपणे पोहोचले. बाळाला पाहाताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला. दरम्यान, या घटनेमुळे ससून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

वंदना मल्हारी जेठे (वय २४ रा. थिटेवस्ती, खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तपासासाठी तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कासेवाडी परिसरात राहणारी बावीस वर्षीय महिला श्वेता उमेश कांबळे आणि त्यांचे बाळ हे ससून रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या मोठ्या मुलीची सोनाग्राफी करायची असल्याने आपल्या बाळाला ओळखीच्या महिलेकडे दिले आणि ती महिला मुलीबरोबर आत गेली. मात्र त्या ओळखीच्या महिलेचे पती रुग्णालयात उपचार घेत असल्याने डॉक्टरांनी त्या महिलेला बोलावले. त्यावेळी आरोपी महिला त्यांच्या शेजारी परिचारिकेच्या वेशभूषेत बसली होती. ‘माझ्याकडे बाळाला द्या, आई आली की मी बाळाला त्यांच्याकडे देईन असे म्हणून आरोपी महिलेने त्यांना आश्वस्त केले. मात्र जेव्हा बाळाची आई बाहेर आली तेव्हा तिला दोघी महिला आणि बाळ दिसले नाही. ती रुग्णालयाच्या बाहेर गेल्यानंतर तिने सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकाकडे बाळासंबंधी विचारपूस केली. तेव्हा रिक्षाचालकाने एक महिला बाळ घेऊन जाताना बाहेर पडली असून, माझ्या मित्राच्याच रिक्षेत बसल्याचे रिक्षाचालकाने सांगितले. रिक्षाचालकाने मित्राला फोन केला आणि त्याला सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर रिक्षाचालक आणि बाळाच्या आईने आरोपी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी महिलेचे ५ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तिला मूल होत नसल्याने तिने बाळ पळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक वंदना सपकाळे यांनी सांगितले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Sassoon disguised as a nurse and abducted a three-month-old baby from the hospital; Accused woman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.