ससूनच्या अधिष्ठातापदावरून ‘रस्सीखेच’; डाॅ. काळे यांची तडकाफडकी बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 01:37 PM2023-01-14T13:37:59+5:302023-01-14T13:40:34+5:30
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी हा बदल्यांचा ‘याॅर्कर’ टाकल्याची चर्चा सुरू...
पुणे : बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आराेग्य संस्थेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर डाॅ. संजीव ठाकूर यांची वर्णी ससूनच्या अधिष्ठातापदी लागली आहे. ते साेलापूरच्या डाॅ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी कार्यरत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी हा बदल्यांचा ‘याॅर्कर’ टाकल्याची चर्चा सुरू आहे.
डाॅ. काळे हे जे.जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदाेन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रूजू झाले हाेते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची बदली करण्यात आली, तर डाॅ. ठाकूर यापूर्वी ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत हाेते.
डाॅ. चंदनवाले गटाला धक्का
ससूनचे अधिष्ठातापदाची खुर्ची हा काटेरी मुकुट असून हे पद राज्यात नेहमीच चर्चेत असते. याआधीदेखील यासाठी ‘रस्सीखेच’ पाहायला मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण खात्यात डाॅ. अजय चंदनवाले व डाॅ. संजीव ठाकूर हे दाेन गट आहेत. त्यापैकी डाॅ. ठाकूर यांची अधिष्ठातापदी वर्णी लागल्याने या गटाची सरशी झाली आहे, तर डाॅ. चंदनवाले यांच्याकडे महाराष्ट्र मानसिक आराेग्य संस्थेचा अतिरिक्त पदभार हाेता. आता त्या ठिकाणी डाॅ. काळे यांची पूर्ण वेळ संचालक म्हणून नियुक्ती झाल्याने डाॅ. चंदनवाले यांची काेंडी झाल्याचे बाेलले जात आहे.
डाॅ. काळे ससून रुग्णालयातच
मानसिक आराेग्य संस्था ही ससून रुग्णालयात २६ नंबर येथे आहे. डाॅ. काळे हे मानसाेपचारतज्ज्ञ असून त्यांच्या शिक्षण व अनुभवानुसार आता त्यांना या संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, ते या बदलीमुळे नाराज असल्याचे कळते.
उपअधिष्ठातापदी डाॅ. तावरे
डाॅ. विनायक काळे यांची बदलीची ऑर्डर येण्याआधी काही तासात न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. अजय तावरे यांची उपअधिष्ठाता पदावर ऑर्डर काढली गेली. मात्र, त्यानंतर काही तासांतच विराेधी गटाचे डाॅ. संजीव ठाकूर हे अधिष्ठाता झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याची चर्चा ससूनमध्ये सुरू हाेती.