ससून ड्रग रॅकेट: ललित नेहमीप्रमाणे गेला मात्र तो परत आलाच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 02:05 PM2023-10-07T14:05:48+5:302023-10-07T14:09:14+5:30

ललित हा नियमितपणे फेरफटका मारण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर जायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे...

Sassoon hospital Drug Racket: Lalit patil went as usual but never came back! | ससून ड्रग रॅकेट: ललित नेहमीप्रमाणे गेला मात्र तो परत आलाच नाही!

ससून ड्रग रॅकेट: ललित नेहमीप्रमाणे गेला मात्र तो परत आलाच नाही!

googlenewsNext

पुणे : ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालविणारा ललित पाटील अजूनही फरार असून, पुणे पोलिसांची दहा पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, ललित सोमवारी (२ ऑक्टोबर) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन पळून गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यात सत्यता किती? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण ललित हा नियमितपणे फेरफटका मारण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर जायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यावर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला होता, असे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ललितच्या नावाने या हॉटेलमध्ये एक रूम बुक असायची आणि तो याआधी देखील अनेकदा त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचा. तो तिथे जाऊन पुन्हा ससूनमध्ये येत असल्याने सोमवारीदेखील तो परत येईल, असा समज भाबड्या ससून प्रशासनाचा आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा झाला असावा. मात्र, यावेळी तो गेला तो परत आलाच नाही. अखेर त्याची वाट बघून दहाच्या सुमारास ललित पसार झाल्याचे सांगण्यात आले.

भूषणच्या कारखान्यावर मुंबई पोलिसांची धाड -

दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील साकीनाका येथे अमली पदार्थ विक्री प्रकरणात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातही ललितचा भाऊ भूषण हा आरोपी असल्याचे साकीनाका पोलिसांना समजताच, त्यांनी शुक्रवारी सकाळीच नाशिक येथील शिंदे गावात कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग जप्त केले. भूषण पाटील हा केमिकल इंजिनिअर असून, त्याने ड्रग कसे बनवायचे? याचे प्रशिक्षण घेतले असल्याची माहितीदेखील यावेळी समोर आली.

पुणे पोलिसांनी भूषणलाही केले आरोपी

ससून रुग्णालयाबाहेर ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर, पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेंतर्गत येणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ससून रुग्णालयातील कैदी वॉर्डमध्ये जात ललितची झडती घेतली होती. यावेळी ललितकडे दोन महागडे मोबाइल सापडले होते. तसेच पोलिस चौकशी करत असताना, त्याच्या मोबाइलवर जर्मन नावाने ४ ते ५ फोनदेखील आले होते. हा जर्मन दुसरा कोणी नसून ललितचा भाऊ भूषण पाटील असल्याची माहितीदेखील समोर आली होती. तसेच ललितला या ड्रग विक्रीतून मिळणारे पैसे भूषणकडे जमा केले जाणार होते, त्यासाठी भूषण फोन करत होता. म्हणजेच, या प्रकरणात भूषणची भूमिकादेखील तेवढीच महत्त्वाची असल्याने पुणे पोलिसांनी या प्रकरणात भूषणलाही आरोपी केले आहे.

Web Title: Sassoon hospital Drug Racket: Lalit patil went as usual but never came back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.