Sasoon Hospital: ससूनमध्ये नांदेडची पुनरावृत्ती? औषधांची टंचाई, सलाईनच्या बाटल्या आल्या संपायला
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 25, 2023 06:06 PM2023-11-25T18:06:11+5:302023-11-25T18:08:30+5:30
‘डीपीडीसी’मधून फंड मिळेना...
पुणे : ससून रुग्णालयात औषधांचा साठा संपत आला आहे. त्यापैकी १० मिलीच्या सलाईनच्या बाटल्यांचाही साठा संपण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे हाफकिनकडून शासनाने खरेदी बंद केली आहे. तर, शासकीय रुग्णालयांना औषधे खरेदी करून देण्यासाठी नवीन औषध खरेदी प्राधिकरणाचेही कामकाज सूरू न झाल्याने व डीपीडीसीमधून फंड न मिळाल्याने ससून हे कात्रीत सापडले आहे. त्यामुळे नांदेड मृत्यूतांडव प्रकरणाची येथे पुनरावृत्ती येथे हाेउ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ससून रुग्णालयाला वर्षाला ८ ते १० काेटी रूपयांची औषधे लागतात. यापैकी सात काेटी रूपये हे राज्य शासन ससूनला औषधांसाठी राज्य शासन वित्तपुरवठा करते. त्यापैकी केवळ १० टक्के म्हणजे ७० लाख रूपयांचा निधी स्थानिक स्तरावर औषधे खरेदी करण्यासाठी उपलब्ध असताे. आतापर्यंत हाफकिनकडून औषधांचा पुरवठा हाेत हाेता. त्यासाठी तीन ते सहा महिने आधी ऑर्डर दयावी लागे. परंतू, आता हाफकिनकडून औषध खरेदी बंद केल्याने व औषध खरेदी प्राधिकरणाचेही काम सूरू न झाल्याने औषध खरेदीची ऑर्डर द्यायची कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘डीपीडीसी’मधून फंड मिळेना-
नांदेड येथील वैदयकीय महाविदयालयात औषधांच्या अभावी रुग्णांना जीव गमवावा लागला. त्यानंतर राज्य शासनाला जाग आली आणि त्यांनी जिल्हा नियाेजन व विकास समितीद्वारे राज्यातील शासकीय वैदयकीय महाविदयालयांना औषधे खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देईल, असे सांगितले हाेते. मात्र, पुण्यातील जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अद्याप ससूनला असा फंड दिला नसल्याचे ससूनमधील अधिका-याने खासगीत सांगितले.