कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ससून रुग्णालयाला ५ कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:56 PM2020-03-16T19:56:01+5:302020-03-16T19:57:20+5:30
४० व्हेंटिलेटरसह अतिदक्षता कक्ष सुरू करणार
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नायडू रुग्णालयातील व्यवस्था भविष्यात कमी पडू शकते. यामुळे ससून रुग्णालयामध्ये नवीन इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर तब्बल ४० व्हेंटिलेटरसह अत्यंत अद्ययावत असा अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ससून रुग्णालयाला तातडीने ५ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
गेल्या आठ-दहा दिवसांत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ वर जाऊन पोहोचली आहे. सध्या पुणे शहरामध्ये नायडू रुग्णालय आणि पिंपरी-चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. परंतु रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात ही व्यवस्था कमी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, सरकारी रुग्णालयासह शहर आणि जिल्ह्यातील काही प्रमुख खासगी रुग्णालयांनादेखील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वंतत्र अतिदक्षता कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असलेल्या ससून रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपाचर करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत.
कोरोना विषाणूची लागण हे सध्या राष्ट्रीय संकट असून, याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगत अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीमधून कोरोनासाठी आवश्यक निधी खर्च करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाºयांना दिल्याचे नुकतेच स्पष्ट केलेहोते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी ससून रुग्णालय व अन्य आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. या बैठकीमध्ये सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था व भविष्यात निर्माण करावी लागणारी व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला. सध्या नायडू रुग्णालयामध्ये केवळ तीन व्हेंटिलेटर असून, अद्याप कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार नाही. यामुळे येत्या काही दिवसांत ससून रुग्णालयामध्ये ४० व्हेंटिलेटरसह अन्य सर्व सोयी-सुविधांयुक्त असा अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. ०००