किडनी रॅकेटनंतर ससूनला आली जाग; अवयव प्रत्याराेपण मान्यता समिती गठित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 09:51 AM2022-06-29T09:51:31+5:302022-06-29T09:55:02+5:30
आयएमएच्या डाॅक्टरांचाही समावेश...
पुणे : किडनी प्रत्याराेपण प्रकरणामध्ये नातेसंबंध तपासून त्यांना मान्यता देण्यासाठी ससून मधील अवयव प्रत्यारोपण समिती तब्बल अडीच महिन्यानंतर पुनर्गठीत करण्यात आली आहे. यामध्ये प्रथमच इंडियन मेडिकल असाेसिएशनच्या दाेन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती गठित झाल्याने आता पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना मुंबईला हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
रूबी हाॅल क्लिनिकमध्ये किडनीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आराेग्य विभागाने रूबीवर कडक कारवाई करत त्यांचा अवयव प्रत्याराेपण परवाना निलंबित केला हाेता. तसेच रुग्णालयाची प्रत्यारोपण समिती स्थगित केली हाेती. त्यानंतर १५ एप्रिलला ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अजय तावरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेली विभागीय मान्यता समिती देखील बरखास्त केली हाेती. तसेच डाॅ. तावरे यांनाही समिती वरून आणि अधीक्षक पदावरून काढून टाकले.
ससून मधील ही विभागीय समिती पुुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर अशी जिल्ह्यांतील प्रत्याराेपणासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मंजुरीसाठी आहे. या समितीचे अध्यक्ष हे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असतात. अधीक्षक पदाचा कार्यभार सध्या डॉ. विजय जाधव यांच्याकडे असून ते समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय पॅथॉलॉजीच्या प्रोफेसर डॉ. लीना नखाते, मायक्रोबायलॉजीच्या प्रा. डॉ. स्मिता पांडे, बाहेरील संस्थात्मक व्यक्ती म्हणून ‘आयएमए’ चे सदस्य डॉ. आशुतोष जपे आणि डॉ. मीनाक्षी देशपांडे याशिवाय आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सध्या पुणे विभागातील अवयव प्रत्यारोपणाच्या परवानगीची प्रकरणे राज्य सरकारच्या समितीकडे जातात. तेथेच त्यावर निर्णय घेतले जातात. आता विभागाची समिती पुनर्गठीत झाल्याने नवी प्रकरणे आता विभागाकडे येण्याला हरकत नाही, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले.
समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. तसेच अवयव प्रत्याराेपणाचे एक प्रकरणही आले आहे. त्याची बैठक लवकरच घेतली जाईल. आता पुन्हा अवयव प्रत्याराेपण प्रकरणे राज्याच्या समितीकडे न जाता आपल्या समितीकडे येतील.
- डाॅ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय