"ससून रुग्णालयात रक्ततपासणीची ‘एसओपी’ ठरवणार" नवनियुक्त अधिष्ठाता म्हस्के यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:59 AM2024-05-31T09:59:29+5:302024-05-31T10:00:07+5:30
विद्यार्थ्यांसाठी संशाेधन आणि अकॅडेमिक प्रक्रियांवर भर दिला जाईल, असा विश्वास ससून रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ. चंद्रकांत म्हस्के यांनी व्यक्त केला....
पुणे : ससून रुग्णालयातील सध्याच्या सुरू असलेल्या रक्ततपासणीबाबत अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर रक्ततपासणी असाे किंवा इतर काेणतीही समस्या असाे, त्यावर उपाय म्हणून ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्राेसिजर’ (एसओपी) म्हणजेच एक मानक नियमावली तयार करू. यामध्ये सर्वांत प्रथम प्राथमिकता हे रुग्णांचे उपचार आणि काळजी घेण्याला असेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी संशाेधन आणि अकॅडेमिक प्रक्रियांवर भर दिला जाईल, असा विश्वास ससून रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ. चंद्रकांत म्हस्के यांनी व्यक्त केला.
डाॅ. म्हस्के हे बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार साेपवला आहे. तर, आधीचे अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे यांना ससून रुग्णालयावर नियंत्रण ठेवता न आल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले हाेते.
डाॅ. म्हस्के यांनी गुरुवारी सकाळीच ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला, त्यावेळी त्यांनी ससूनसमाेरील काेणत्या समस्या आहेत ते साेडवण्याचे आश्वासन दिले. डाॅ. म्हस्के म्हणाले की, ससून रुग्णालय हे सर्वांत माेठे शासकीय रुग्णालय असून, येथे माेठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असते. त्या रुग्णांना सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. तसेच सध्या ससून ज्या कारणांमुळे चर्चेत आहे, असे प्रकार पुन्हा हाेऊ नयेत, याबाबत ताेडगा काढण्यात येईल.
डाॅ. म्हस्के हे ससूनचे माजी विद्यार्थी
डाॅ. म्हस्के हे ससून रुग्णालयाचे माजी विद्यार्थी आहेत. ते त्वचाराेगतज्ज्ञ असून, त्यांनी ससून रुग्णालयात २००५ ते २०१६ पर्यंत ससून रुग्णालयाचा त्वचाराेग विभागाच्या प्रमुखपदाचा पदभारही सांभाळलेला आहे. २०१६ नंतर त्यांची बदली प्रथम छत्रपती संभाजीनगर, नांदेड व्हाया त्यांना बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे पद देण्यात आले. त्यानंतर आता थेट ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
ससूनमधील सुरक्षारक्षकांचा वेढा शिथिल
डाॅ. विनायक काळे यांनी पत्रकारांनी भेटू नये आणि प्रश्न विचारू नयेत, यासाठी त्यांच्या दालनाभाेवती सुरक्षा व्यवस्थेचा वेढा बसवला हाेता. परंतु, डाॅ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर सुरक्षेचा वेढा गुरुवारी शिथिल करण्यात आल्याचे दिसून आले.