कोरोनाच्या ऐन पिकमध्येच ससूनची यंत्रणा ठरतेय कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:07+5:302021-04-05T04:11:07+5:30
सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येने तब्बल दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. परिस्थिती खरोखरच ...
सुषमा नेहरकर-शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येने तब्बल दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. परिस्थिती खरोखरच हाता बाहेर गेली आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाची हक्काचे ससून रुग्णालयाची यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. ससून रुग्णालयाची क्षमता तब्बल १६०० बेड्स क्षमता असताना आज केवळ ३५० बेड्स कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. गतवर्षी देखील सप्टेंबर, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोना पिकवर असताना ससून रुग्णालयाने दुरुस्तीच्या नावाखाली रुग्णालय काही दिवस कोविड रुग्णांसाठी बंद ठेवले होते. याबाबत शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. मुरलीधर तांबे यांना परिस्थिती लक्षात घेऊन सुधारणा करा, नाही तर मला लक्ष घालावे लागेल इशारा दिला.
पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी प्रशासनाच्या आग्रहाखातर पुणे जिल्ह्यात सात दिवसांचा मिनी लाॅकडाऊन लोकांवर लादला गेला आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधीने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करा, अशी मागणी केली. यावेळी जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि उपलब्ध बेड्सचा पण आढावा घेण्यात आला.
--
.. तर शहरातील किमान २५ खासगी हाॅस्पिटल कोविड सेंटर करणार
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दोन्ही जम्बो हाॅस्पिटलसह, ससून रुग्णालयातील कोविड बेड्सची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत सांगितले. तसेच शहरातील किमान २५ खासगी हाॅस्पिटल कोविड हाॅस्पिटल म्हणून जाहीर करावी लागतील, असे देखील स्पष्ट केले. या वेळी राव यांनी ससून रुग्णालयाची क्षमता १६०० बेड्सची आहे. ससूनमध्ये आपल्याला किमान ५० टक्के म्हणजे ७००-८०० पर्यंत बेड्स कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत. सध्या येथे केवळ ३५० बेड्स कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. ही क्षमता वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगत राव यांनी ससूनकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे जाहीर बैठकीत सांगितले. यावर पवार यांनी ससूनचे तांबे यांना परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य ते व तातडीने बदल करा, अन्यथा मला लक्ष घालावा लागेल असा इशारा देखील दिला.
--
ससूनवर आतापर्यंत कोविडसाठी २६ कोटींचा खर्च
गरीब व सर्वसामान्य कोविड रुग्णांना हक्काचे हाॅस्पिटल उपलब्ध व्हावे व येथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स बेड्स वाढविण्यासाठी एकट्या ससून हाॅस्पिटलवर कोरोनासाठी सुमारे तब्बल २६ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. एवढा मोठा खर्च करून देखील ससून रुग्णालयात अपेक्षित बेड्सची क्षमता वाढली नाही.