सासवड जेजुरी पुलाला भगदाड; बारामतीशी संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 09:49 AM2019-09-26T09:49:02+5:302019-09-26T09:56:28+5:30
पुणे-बारामती रस्त्यावरील सासवड ते जेजुरी मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुणे-बारामती दरम्यानचा संपर्क तुटला आहे.
पुणे - पुणे-बारामती रस्त्यावरील सासवड ते जेजुरी मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुणे-बारामती दरम्यानचा संपर्क तुटला आहे. पुणे बारामतीदरम्यान दररोज हजारो वाहने ये जा करत असतात. काल झालेल्या तुफान पावसाने सासवड गावातून जेजुरीकडे जाणाऱ्या स्मशानभूमीजवळील पुलाचा मोठा भाग तुटून पडला असून भगदाड पडले आहे. त्यामुळे रात्रीपासून हा रस्ता बंद झाला आहे. दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकून पडली आहे.
बारामतीला जाण्यासाठी जेजुरीहून मोरगाव मार्गे किंवा निरा मार्गे असे दोन रस्ते जातात. पण सासवडहून पुढे जेजुरीच्या मार्गावरील हा पुलाचा भाग कोसळल्याने संपूर्ण वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे आता बारामतीला जाण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावरुन पाटस मार्गे हा एकमेव रस्ता पुणे शहराशी जोडणारा राहिला आहे.
बारामतीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग होता. तो बंद पडल्याने यामुळे दररोज कामानिमित्त, व्यवसायानिमित्त बारामतीला जाणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. पुण्याहून बारामतीसाठी दर 15 मिनिटांनी नॉन स्टॉप एस टी बस जाते. इतकी गर्दी या मार्गावर असते. त्याचवेळी पाटसमार्गे सर्व वाहतूक वळविण्यात येणार असल्याने या रस्त्यावर मोठा ताण येणार आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला 50 वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील 15 हजार, बारामतीच्या 7 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
कऱ्हा नदीकाठी असणाऱ्या आंबी बु, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी, जळगावकडे पठार, जळगाव सुपे आदी गावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दीड वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.