सासवड-पुरंदरचा पारा ४१.६ अंशांवर
By admin | Published: May 6, 2017 01:58 AM2017-05-06T01:58:20+5:302017-05-06T01:58:20+5:30
सासवडसह पुरंदरच्या परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असून गुरुवारी (दि. ५) दुपारी अडीच वाजता ढगाळ वातावरणासह
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : सासवडसह पुरंदरच्या परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असून गुरुवारी (दि. ५) दुपारी अडीच वाजता ढगाळ वातावरणासह कमाल तपमान ४१.६ अंश व किमान तापमान २१.६ अंशांवर होते, अशी माहिती आचार्य अत्रे प्रतिष्ठान वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी दिली.
गतवर्षी याच महिन्यात कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस होते व किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअसवर होते. या वर्षी १ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात तापमानात थोडी घट होऊन उष्णता कमी झाली होती, मात्र आता पुन्हा उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. पुरंदर तालुका घाटमाथ्यावर असल्याने येथील हवामान काही वर्षांपूर्वी थंड होते, परंतु सध्या झालेली बेसुमार वृक्षतोड, वाहनांच्या संख्येत झालेली मोठी वाढ आणि वाढलेली रहदारी यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे व हवेत उष्णता वाढत आहे.
वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होत असून ताप, सर्दी, उलट्या होणे, अंगदुखी आदी आजार वाढत आहेत. सायंकाळी सासवड परिसरात वादळी वारे वाहू लागले आहेत.
सध्या अवकाळी पावसाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी व डाळिंब, अंजीर या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.