सासवडला "ब्रेक द चेन" अंतर्गत पाळणार पाच दिवसांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:19+5:302021-04-07T04:11:19+5:30
सासवड : कोविड १९ च्या संसर्गजन्य साथीचा दुसरा टप्पा संपूर्ण भारतात सुरू झाला असून कोविड १९ चा टप्पा ...
सासवड : कोविड १९ च्या संसर्गजन्य साथीचा दुसरा टप्पा संपूर्ण भारतात सुरू झाला असून कोविड १९ चा टप्पा १ च्या तुलनेत या टप्प्यात रुग्णांच्या संख्येने मोठे थैमान महाराष्ट्रातील मुंबई व पुणे जिल्ह्यात घातले आहे. कोविडच्या या नव्या स्ट्रेनने संपूर्ण सासवड मधे शिरकाव केला असून कम्युनिटी ट्रांसमिशनला सासवडमधे सुरुवात झाली आहे.वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करणेसाठी पाच दिवसाचा कडकडीत बंदपाळण्याचे ठरले आहे.
गेले आठवडाभर सातत्याने सुमारे ७० चे वर कोरोनाग्रस्त रूग्ण सापडत असून अल्पावधीतच या साथीने प्रतिदिन रूग्णांची शंभरी गाठली आहे . सासवड बाजारपेठ, गावठाण, सोपाननगर व संपूर्ण सासवड पूर्णपणे कोरोनाग्रस्त झाले असून सासवडच्या दृष्टीने ही तिव्र चिंताजनक बाब झाली आहे. आरोग्य सुविधा लवकरच अपु-या पडतील असे वाटत असल्याने कोरोना या साथीच्या रोगास अटकाव करणेसाठी व्यापारी बंधूची तातडीची सभा कुंथुनाथ स्वामी जैन मंदिर, सासवड येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस व्यापारी बंधूनी मोठा प्रतिसाद दिला.
.विभागीय आयुक्त यांच्या "ब्रेक द चेन " या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सासवडमधे ७ ते ११ एप्रिल असा पाच दिवसाचा कडकडीत कर्फ्यू" पाळण्याचे ठरले आहे.
सदर कडकडीत बंदमध्ये सर्व व्यापारी आस्थापना म्हणजे किराणा, भुसार, आडते, बेकरी, हॉटेलस आदी सर्व सहभागी होणार असून सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सर्वानी हा बंद यशस्वी करून "ब्रेक द चेन" या शासन धोरणाचे पालन करून कोरोना साखळी तोडावयाची आहे व लवकरात लवकर सासवडला कोरोना मुक्त करावयाचे आहे, असे आवाहन व्यापारी असोसिएशनने केले आहे. सभेस सासवड नगरपालीकेचे मुख्याधिकारी विनोद जळक,आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, ऊमेश जगताप, बाबुशेठ सोळंकी, रमेश सोळंकी,दिलीप चिंबळकर, हारून बागवान,गिरीश कर्नावट,मंगेश नाचण,मेडिकल असोसिएशनचे नंदकुमार जगताप, शाम महाजन,बाबा लांडगे , मुन्ना सोळंकी,आशपाक तांबोळी ,मुन्ना तांबोळी आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.