सासवडला उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

By admin | Published: May 31, 2017 01:55 AM2017-05-31T01:55:47+5:302017-05-31T01:55:47+5:30

शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा

Saswadla from tomorrow for two days water | सासवडला उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

सासवडला उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा शिल्लक राहिला असून सासवडला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील योजनेची चारी उघडी पडली आहे. त्यामुळे १५ एचपीच्या दोन मोटार जुन्या धरणात टाकून जॅकवेलपर्यंत पाणी घेतले जात आहे. यामुळे पाणी कमी प्रमाणात उचलण्यात येत असल्याने सासवडला १ जूनपासून दोन दिवसांआड मात्र चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष विजय वढणे यांनी दिली.
सासवडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्ष भोंडे यांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक दिनेश भिंताडे व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून मोठ्या प्रमाणात आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या या ठिकाणी ४०० एमसीएफटीएवढा मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
सासवडला दररोज ५० ते ६० लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या वीरमधून ४० लाख आणि घोरपडी पाझर तलावातून १० लाख लिटर पाणी घेण्यात येत आहे. गराडे पाझर तलावातील पाणी यापूर्वीच संपले आहे. गतवर्षी या दिवसांत वीरमध्ये पुरेसा पाणीसाठा होता, तसेच सासवडच्या योजनेची चारी उघडी पडली नव्हती, त्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. आता मात्र पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय वढणे यांनी दिली. त्यातही सध्या वादळी वारे किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
२००३-०४ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण ३५ किमी लांबीची, सुमारे २० कोटी रुपये खर्चाची ही योजना केवळ ९० दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. लिम्का बुकमध्ये याची नोंद झाली आहे. वीर योजनेची जॅकवेल ही १५ फूट रुंद असून तिची उंची २५ फूट आहे. त्या वेळी असणाऱ्या पंपामधून आजही पाणीउपसा केला जात आहे, या पंपांची पाणीउपसा करण्याची क्षमता आता कमी झाली आहे. त्यामुळे हे पंप पुढील काळात बदलण्यात येणार असून या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून पंप चालविले जाणार आहेत. सध्या वीर योजनेवर जास्त अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही नगराध्यक्ष भोंडे व उपनगरध्यक्ष वढणे यांनी केले आहे.

Web Title: Saswadla from tomorrow for two days water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.