देशपातळीवर सासवड पालिका चमकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:26 AM2018-05-18T01:26:46+5:302018-05-18T01:26:46+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचा निकाल नुकताच दिल्ली येथे जाहीर करण्यात आला.
सासवड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचा निकाल नुकताच दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. यामध्ये सासवड नगरपालिकेचा देशपातळीवरील पश्चिम विभागात प्रथम क्रमांक आला आहे. नगरपालिकेला १५ कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम राज्य शासनाकडून मिळणार आहे. तर, पंतप्रधानांच्या हस्तेही सन्मान होणार आहे.
नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी विनोद जळक व नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी याबाबत माहिती दिली. देशातील ४ हजार २०३ नगरपालिकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून सासवड नगरपालिकेला देशाच्या एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पश्चिम विभागात नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली प्रकारात प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. हे वृत्त समजताच सासवड शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाक्यांच्या जल्लोषात आनंद व्यक्त केला.
या वेळी सत्ताधारी जनमत विकास आघाडीचे प्रमुख व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. कै. चंदुकाका जगताप यांच्या स्मृतींना
हे बक्षीस अभिवादन आहे.
पुढील वर्षातही पालिका स्पर्धेत उतरून पुन्हा काम दाखवेल, असे ते म्हणाले. सासवड नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यानुसार विविध प्रकारची कामे चालू केली. यातील महत्त्वाचा कचरावेचकांचा प्रश्न यासाठी नगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कचरावेचकांचा समावेश करून घेऊन कचऱ्याचे १०० टक्के घरोघरी जाऊन संकलन केले गेले.
बगिचामध्ये व कचरा डेपोमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती करून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताला महाराष्ट्र शासनाचा हरित महा सिटी कंपोस्ट हा ब्रँड विपणन व विक्री करण्यासाठीचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ डिसेंबर २०१७ ला नगर परिषदेला मुंबई येथे प्रदान करण्यात आले.
>सॅनिटरी नॅपकीनचे शास्त्रोक्त संकलन
घनकचºयातील सॅनिटरी नॅपकीनच्या शास्त्रोक्त संकलनासाठी नगरपालिकेच्या प्रत्येक कचरा संकलन वाहनावर हायजिन बॉक्सची व्यवस्था केली. पालिकेचे मुख्यधिकारी विनोद जळक यांनी राबविलेल्या हायजिन बॉक्स या संकल्पनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. सासवड शहरात प्रतिमहा ४० ते ५० हजार सॅनिटरी नॅपकीन कचºयात जमा होत होते. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून मुख्याधिकारी विनोद जळक यांनी हायजिन बॉक्स ही संकल्पना अमलात आणली. सिद्धेश साकोरे या विज्ञान आश्रम, पाबळ यांच्याकडील विद्यार्र्थ्यांच्या मदतीने सासवड नगरपालिकेने हायजिन बॉक्सचा शोध घेतला, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली. या प्रसंगी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, माया जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, संजय ग. जगताप, प्रवीण भोंडे, दीपक टकले, सचिन भोंगळे, चंदू गिरमे, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका वसुधा आनंदे, निर्मला जगताप, पुष्पा जगताप, विद्या टिळेकर, सारिका हिवरकर, सीमा भोंगळे, मंगल म्हेत्रे, भाग्यश्री जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, रामानंद कळसकर आदी उपस्थित होते.