सातबारा फक्त एका क्लिकवर!
By admin | Published: June 19, 2017 05:28 AM2017-06-19T05:28:38+5:302017-06-19T05:28:38+5:30
कुरकुंभ येथे ई-सातबारा चावडीवाचनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ग्रामस्थांना त्यांच्या सातबारामधील त्रुटी व शंकानिरसन करण्यासाठी महसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : कुरकुंभ येथे ई-सातबारा चावडीवाचनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ग्रामस्थांना त्यांच्या सातबारामधील त्रुटी व शंकानिरसन करण्यासाठी महसूल विभागामार्फत आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेत या बदलत्या काळातील बदलत्या यंत्रणेला जणू पाठिंबाच दिला आहे.
सातबारा मिळवण्यासाठी सामान्य ग्रामस्थांची होत असणारी ससेहोलपट आता थांबणार आहे. आता फक्त एका क्लिकवर सातबारा उपलब्ध होणार असून, तो सहजरीत्या उपलब्ध होता यावा यासाठी शासनाने मागील काही वर्षांत या आॅनलाइन सातबाऱ्यावर काम करीत सामान्यांची ही परवड दूर केली आहे.
कुरकुंभ येथील चावडीवाचनात सातबाराच्या कामाची पाहणी करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. दरम्यान, कुरकुंभ येथील आॅनलाइन सातबाराचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या एक आॅगस्टपासून सर्वांना याचा प्रत्यक्षरीत्या फायदा होणार असल्याची माहिती कुरकुंभचे तलाठी बापू देवकाते यांनी दिली. या कार्यक्रमासाठी मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे, ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड, सरपंच जयश्री भागवत, उपसरपंच रशीद मुलाणी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.