मतदारांना साड्या अन् तीर्थयात्रा!
By admin | Published: December 29, 2016 03:13 AM2016-12-29T03:13:11+5:302016-12-29T03:13:11+5:30
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याआधीच खेड तालुक्यात वारेमाप उधळपट्टी सुरू झाली आहे. काही मतदारसंघांत इच्छुकांनी खुलेआम साडीवाटप
राजगुरुनगर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याआधीच खेड तालुक्यात वारेमाप उधळपट्टी सुरू झाली आहे. काही मतदारसंघांत इच्छुकांनी खुलेआम साडीवाटप सुरू केले आहे. तसेच मतदारांना सहली घडवून आणण्यात येत आहेत. मंडळांना देणग्या देण्यात येत आहेत आणि सोशल मीडियावर ‘पोस्ट’चा सुकाळ झाला आहे. काहींनी जेवणावळीही सुरू केल्या आहेत.
आगामी निवडणुका जवळ आल्या असल्या, तरी अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, इच्छुकांमध्ये आधीपासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. काहींना पक्षश्रेष्ठींनी तिकिटासाठी हिरवा कंदील दाखविला असल्याने, तर काहींचे तिकीट नक्की नसतानाही त्यांनी फ्लेक्सबाजी, सोशल मीडियावर मेसेजेसचा तडाखा लावला आहे. कोणाच्याही वाढदिवसाचे अथवा निवड-नियुक्तीचे निमित्त शोधून स्वत:ची प्रसिद्धी करून घेतली जात आहे. काहींनी तर निमित्त नसतानाही स्वत:ची पोस्टर झळकावली आहेत. मतदारांना तीर्थयात्रांना धाडले जात आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावून मंडळांना, संस्थांना देणग्या दिल्या जात आहेत. सगळ्यात कहर म्हणजे महिलांना सर्रास साडीवाटप सुरू केले आहे. या साड्यांचा दर्जाही फारसा चांगला नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. मात्र, कोणी आपणहून साड्या दिल्या तर नाकारायच्या कशा, असा प्रश्न महिला मतदारांपुढे आहे. काहींनी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली आहे. येनकेन प्रकारेण मतदारांना आमिषे दाखवून आपल्याकडे वळविण्याचा आटापिटा सुरू झाला आहे.
प्रत्यक्ष निवडणुकीत खर्चाला मयार्दा असल्याने आधीच मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खर्च करणारे बहुतेक धनदांडगे असल्याने शासनाकडून मात्र याकडे डोळेझाक होत आहे. आजपर्यंत तरी काही कारवाई झाल्याची माहिती नाही. काही जण सरळ पक्षाचे चिन्ह वापरीत असल्याने अधिकारी याची दखल घेणार का, याची आता उत्कंठा आहे. नोटाबंदी असतानाही खर्च करीत असलेल्या उमेदवारांवर छापे मारून चौकशी करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
मात्र, गावोगावच्या युवक मतदारांकडून याबद्दल नापसंती व्यक्त केली जात आहे. अप्रत्यक्षपणे मतदारांना विकत घेण्याचाच हा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे असून, या प्रवृत्तींना या वेळी धडा शिकविण्याचा त्यांचा मनोदय आहे. तशा प्रकारच्या पोस्ट ते सोशल मीडियावर टाकीत आहेत. आज पैसे खर्च करणारे उद्या हे पैसे वसूल करण्यासाठीच वेळ घालवतील आणि विकासकामे तशीच राहतील, असा एक मतप्रवाह नवमतदारांमध्ये आहे. याउलट, अनेक मतदार सध्या सर्वांकडून भेटी घ्यायच्या; निवडणुकीत मत कोणाला द्यायचे ते पाहू, असा विचार करीत आहेत. इच्छुकांच्या पैशाला ऊत आला असेल, तर आम्ही का मागे राहायचे, असा त्यांचा सवाल आहे. गेल्या वर्षी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी सर्वांचे पैसे घेतले होते. शेवटी सर्वच पैसे वाटणारे काही निवडून आले नाहीत. याचबरोबर, डावपेचांनाही सुरुवात झाली आहे. आपल्यालाच तिकीट आहे म्हणून खर्च चालू केला आहे, असे भासविले जात आहे. खर्च केल्याचा आभास निर्माण करायचा आणि प्रत्यक्षात फारसा खर्च करायचा नाही, अशी काहींची आयडिया आहे. समोरच्या उमेदवाराला भीती घालण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. तर, पैशावर मतदार विकत घेऊन निवडणूक जिंकणार, अशी घमेंडीची भाषा काहीजण बोलत आहेत. खरे तर ते आतून टरकले आहेत; पण खोटा आव आणून आपणच निवडून येणार असल्याची शेखी मिरवीत आहेत. काहीजण पुढच्याचा आताच खर्च व्हावा आणि निवडणुकीत तो मागे पडावा म्हणून सावध पावले उचलत आहेत. (वार्ताहर)
- सर्व पक्षांचे श्रेष्ठी तिकीट कुणाला द्यायचे, या विचारात गढले आहेत. आपल्याशी भविष्यात स्पर्धा करणारा उमेदवार नको, असा त्यांचा मानस आहे. एखादे ‘सीट’ गेलेले परवडले; पण भविष्यात डोकेदुखी नको, अशी त्यांची भूमिका आहे, तर काही श्रेष्ठी येनकेन प्रकारेण भावी डोकेदुखीचे पत्ते आताच्या तिकीटवाटपातच कापायचे, त्यासाठी आरपारची लढाई लढावी लागली तरी चालेल, अशा पावित्र्यात आहेत.
- काही साधे कार्यकर्ते असलेले इच्छुक उमेदवार परिचयपत्रक घेऊन घरोघर फिरत आहेत. आपल्याकडे पैसे नाहीत; मात्र गुणवत्ता आहे, तळमळ आहे, स्वच्छ चारित्र्य आहे. मतदारांनी धनदांडग्यांचे पैसे घेऊन त्यांचा माज जिरवावा; मात्र हाडाच्या कार्यकर्त्यालाच निवडून द्यावे, अशी भूमिका ते मांडत आहेत.