"सातारची लेक पुणे मेट्रोची पहिली लोकोपायलट..." उदयनराजेंकडून अपूर्वा अलाटकरचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 04:37 PM2023-08-05T16:37:09+5:302023-08-05T16:41:59+5:30
साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणेमेट्रोचे लोकार्पण झाले. त्यानंतर पुणे मेट्रोची जबाबदारी महिलांचा मोठा चमू सांभाळत आहे. यामध्ये ७ महिला मेट्रो चालवत असून, ६ महिलांकडे मेट्रो स्थानकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. सर्व मेट्रो स्थानकांचे व्यवस्थापनही एक महिलाच सांभाळत आहे हे विशेष. लोकोपायलट अपूर्वा प्रमोद अलाटकर हिने मेट्रोची 'मास्क ऑन की' च्या साथीने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली होती. अपूर्वा सातारा जिल्ह्यातील आहे. सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी तिचे कौतुक केले आहे. याबद्दलची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती.
या पोस्टमध्ये राजेंनी कौतुक करताना लिहले, सातारा शहरातील शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीत अपूर्वा अलाटकर राहते. सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला २०१९ मध्ये पुणे मेट्रोसाठीच्या विविध पदांसाठीची माहिती तिला मिळाली. अर्ज केल्यानंतर अपूर्वाला पहिल्या फेरीसाठी मेट्रोकडून बोलावण्यात आले. पहिली, दुसरी व तिसऱ्या फेरीतील सर्व निकष, कठीण पातळ्या पूर्ण करत फेब्रुवारी २०२३ मध्ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्थान पक्के केले. निवडीनंतर तिच्याकडे वनाझ स्थानकाच्या स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली.
मेट्रोच्यावतीने पुण्यात चार मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गांच्या लोकार्पणाची तयारी प्रशासनाकडूवन सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरल्यानंतर चारही मार्गांवर धावणाच्या मेट्रो चालवण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणार्थीमध्ये अपूर्वाचा देखील समावेश होता. हे ४५ दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले. नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत मास्क ऑन की सह सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने 'मास्क ऑन की'चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे मार्गस्थ केली. अपूर्वाच्या कामगिरीबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे तिला पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा, अशा शुभेच्छा उदयनराजेंनी दिल्या.
साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) August 3, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने मास्क ऑन की चा वापर करत मेट्रो मार्गस्थ केली. अपूर्वा च्या कामगिरीबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे तिला पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा. pic.twitter.com/NRcFVRJWre
मेट्रो चालविणाऱ्या व स्थानक व्यवस्थापन करणाऱ्या महिलांची नावे
मेट्रो चालक महिला
अपूर्वा अलटकर
गीतांजली थोरात
पल्लवी शेळके
शर्मिन शेख
सविता सुर्वे
प्रतीक्षा माटे
पूजा काळे
स्थानक व्यवस्थापक
दिव्या रामचौरे
शीला जोगदंड
माधवी फुलसौंदर
मृणाल काळमेघ
प्रतीक्षा कांबळे
समीक्षा धरमथोक
कामाचा अनुभव रोमांचकारी
लोको पायलट म्हणून काम करणं ही माझ्यासाठी खरोखरंच आनंददायी बाब आहे. आज महिला विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? या कामाचा अनुभव रोमांचकारी आहे. तरुणींनीदेखील करिअरच्या वेगळ्या वाटा शोधायला हव्यात. त्यांना यश नक्कीच मिळेल, असे मला वाटते.
- अपूर्वा अलटकर, लोको पायलट