शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी सातारच्या पैलवानाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:25 PM2021-10-25T20:25:34+5:302021-10-25T20:27:37+5:30
अमर श्रीरंग जाधव (वय ६२, रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या पैलवानाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे: पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आणखी एकाला अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी सातारा येथून एका पैलावानाला अटक केली. अमर श्रीरंग जाधव (वय ६२, रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या पैलवानाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी आमदार अनिल शिवाजीराव भोसलेसह 8 आरोपींना अटक केली आहे. अमर जाधव हा त्यातील नववा आरोपी आहे. आतापर्यंत या बँकेत 496 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आतापर्यंतच्या तपासात अटक केलेल्या आरोपींनी संगणमत करून बोगस कर्जदारांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे बँकेतील ठेवीदारांचे पैसे कर्ज स्वरूपात घेऊन त्याचा अपहार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी अमर जाधव याने ८० कोटींचे बनावट चेक डिसकाउंटिग केल्याचे समोर आले. त्याच्यानंतर युनिट चारच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी सातारा येथून त्याला अटक केली. आता या संपूर्ण गैरव्यवहाराबद्दल त्याच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीतून आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.