ऋतुजा शेजवळच्या उपग्रहाची आकाशात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:00+5:302021-03-07T04:11:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व पेडोल क्यूब चॅलेंज स्पेस रिसर्च ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व पेडोल क्यूब चॅलेंज स्पेस रिसर्च इंडियाद्वारे आयोजित चॅलेंजमध्ये जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रॉडिजी पब्लिक स्कूल वाघोली या विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा शेजवळ सहभागी झाली होती. तिने बनवलेल्या पेडोल क्यूब चॅलेंज या उपग्रहाने रामेश्वर येथून आकाशात भरारी घेतली.
या पेडोल क्यूब चॅलेंजमध्ये देशातील एक हजार विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले शंभर उपग्रह रामेश्वरम येथून एकाच वेळी बलूनद्वारे अवकाशात सोडण्यात आले. यात महाराष्ट्रातील ३९५ विद्यार्थ्यांनी ३९ उपग्रह बनवले आहेत. या उपग्रहाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या उपग्रहामुळे हवेतील आर्द्रता व प्रदूषण, तापमान वायूचे प्रमाण, हवेतील प्रदूषणामुळे ओझोन वायूची होणारी हानी आदींचा अंदाज येणार आहे.
विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह बलूनद्वारे सोडल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ,भारतीय बुक रेकॉर्ड , एशियन बुक रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. या उपक्रमांतर्गत जगातील सर्वात कमी वजनाचे २५ ते ८० ग्रॅम वजनाचे शंभर उपग्रह ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर बलूनद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. कलाम फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी व महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. ऋतुजाच्या या यशाचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. तानाजी सावंत यांनी कौतुक केले.
चौकट
ऋतुजाच्या या भरारीचे कौतुक करण्यासाठी विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा. ऋषिराज सावंत यांच्या हस्ते ऋतुजा व तिच्या आई-वडिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ऋतुजा म्हणाली, “मी तयार केलेला उपग्रह अवकाशात गगन भरारी घेत असतानाचा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आहे.”