कमी शुल्कामध्ये सर्वांत ॲडव्हान्स शिक्षण देण्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:48+5:302021-09-21T04:11:48+5:30
————— पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये नावाजलेल्या शाळांच्या तुलनेमध्ये श्री शिवाजी प्रीपेरेटरी मिलिटरी स्कूल ही सर्वांत कमी शुल्क घेणारी शाळा तर ...
—————
पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये नावाजलेल्या शाळांच्या तुलनेमध्ये श्री शिवाजी प्रीपेरेटरी मिलिटरी स्कूल ही सर्वांत कमी शुल्क घेणारी शाळा तर आहेच, मात्र सर्वात ॲडव्हान्स शिक्षण देणारी आणि सर्वांत आधी ऑनलाईन शिक्षण देणारी शाळा ठरते याचं मनस्वी समाधान आहे.
कल्याणकारी राजा म्हणून साऱ्या जगात ख्याती असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून १९७२ मध्ये या शिक्षणसंस्थेची स्थापना केली आणि पुढे आत्ताचे शाहू महाराज व मालोजी राजे आणि मधुरिमा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासारख्या विद्येचे माहेर घर म्हणवल्या जाणाऱ्या शहरात आमची शाळा तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत सर्वांत आधी ऑनलाईन शिक्षण देणारी शाळा ठरली. राजर्षी शाहू महाराजांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद ठेवून या संस्थेची सुरुवात केली होती. आज पुण्यामध्ये शिक्षणाचा बाजार मांडला जात असताना आणि शाळांची फी आसमंताला भिडत असताना आम्ही मात्र सर्वसामान्य घरातील पालकांच्या खिशाला परवडेल इतक्या शुल्कामध्ये मुलांना इतर शाळेच्या तुलनेतील सर्वोत्तम शिक्षण देत आहोत हेच या शाळेच सगळ्यात वेगळेपण म्हणता येईल.
मला स्वत:ला शिक्षण क्षेत्राबद्दलच प्रचंड आस्था होती. माझ्या मावशीला कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागात शिक्षिका म्हणून काम करताना पाहिलं. तिने राबविलेले उपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार आणि त्या माध्यमातून मिळणारे जॉब सॅटिस्फॅक्शन इतर कोणत्याच प्रोफेनशनमध्ये मिळत नाही. त्यामुळे मी टीचर व्हायचं ठरविले. मात्र, दुसरीकडे शिक्षणाची आवडही असल्याने मी एमएडपर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर मी शिवाजी श्री शिवाजी प्रीपेरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये ज्युनिअर कॉलेजवर टीचर म्हणून जॉईन झाले. शाहू महाराज आणि मालोजीराजे आणि मधुरिमा मॅडम यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली शाळेत अनेक उप्रकम करण्यास कायम प्रोत्साहन मिळत गेले आणि मी अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या ज्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी तर वाढलीच, मात्र गुणवत्ताही वाढली. त्यामुळे मालोजीराजेंच्या आदेशाने मी शाळेच्या प्रिन्सिपलची धुरा सांभाळली आणि मग इंग्लिश मीडियम स्कूल असतानाही भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण-वारसुद्धा शाळेत पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यावरही आम्ही भर दिला, जेणेकरून विद्यार्थ्यांना भारतीय परंपररेची ओळख व्हावी. इतकेच नव्हे मुलांची निसर्गाशी मैत्री व्हावी, यासाठी शाळेमध्ये पर्यावरणपूरक डे साजरे केले जातात. शाळा बंद असल्या, तरी ऑनलाईनच्या माध्यमातून विविध डे सेलिब्रेट केले जातात, नुकताच आम्ही स्परो डे साजरा केला त्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोरोनाकाळात शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यावर पुण्यामध्ये सर्वात सुरुवातील अगदी मार्च महिन्यातच आम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते. त्यामुळे अनेक दिग्गज शाळांनीही आमच्याकडे ऑनलाईन शाळा कशी सुरू करायची, याची माहिती घेतली. त्यावरून आपल्या शाळेत किती ॲडव्हान्स पद्धतीने शिक्षण दिले जाते हेच अधोरेखीत होते.
जगाच्या शिक्षण पद्धतीशी भारतीय शिक्षणाच्या पद्धतीची तुलना किंवा स्पर्धा करताना आपल्या शैक्षणिक धोरणात अनेक बदल करणे अपेक्षित आहे. ज्या पद्धतीन महाविद्यालयांचे मूल्यांकन नॅक कमिटीकडून होते व त्या महाविद्यालय किंवा विद्यापीठांचा दर्जा ठरविला जातो तसे मूल्यांकन शाळांचेही झालेच पाहिजे त्यासाठी स्वतंत्र मंडळ निर्माण झाली पाहिजे. ॲक्शन आणि प्रोजेक्ट बेस शिक्षण देणे गरजेचे आहे. शिवाय एक वर्गात चाळीस मुलांचा पट अशी अट असली, तरी आज बहुतांश शाळांत ५० पेक्षा अधिक विद्यार्थी असतात त्यामुळे मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जात नाही. पटसंख्येसह इतर नियम पाळले जावेत, यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाली पाहिजे तरच सर्व शाळांमध्ये मुलांवर वैयक्तिक लक्ष दिले जाईल आणि शिक्षणाचा खरा हेतू साध्य होईल.
(शब्दांकन : दीपक होमकर )