पुणे मेट्रोच्या प्रगतीबाबत कर्जदाते समाधानी; पर्यावरण संवर्धनाचेही कौतुक, केली संयुक्त पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 07:27 PM2018-01-20T19:27:29+5:302018-01-20T19:29:50+5:30
मेट्रो प्रकल्पाला काहीशे कोटी रूपयांचे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध करून देणाऱ्या परदेशी वित्तीय संस्थांनी या कामाच्या प्रगतीची संयुक्त पाहणी केली. कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त केले.
पुणे : मेट्रो प्रकल्पाला काहीशे कोटी रूपयांचे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध करून देणाऱ्या परदेशी वित्तीय संस्थांनी या कामाच्या प्रगतीची संयुक्त पाहणी केली. कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी महामेट्रो कंपनीच्या वतीने काम करताना पर्यावरण संवर्धनासाठी राबवत असलेल्या विविध उपायांचे कौतुक केले.
केंद्र सरकारच्या आर्थिक विभागाने केलेल्या शिफारशीनंतर युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँक (ईआयबी) व फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) या दोन्ही बँका पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला अनुक्रमे ६०० दशलक्ष व २४५ दशलक्ष युरो कर्ज देण्यास तयार झाल्या आहेत. यापैकी युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँकेने (ईआयबी) पुणे मेट्रो प्रकल्पाला एकदा तर फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीने (एएफडी) प्रकल्पाला दोनदा भेट दिली आहे. गुरूवारी या दोन्ही संस्थांनी प्रत्यक्ष काम सुरू आहे त्याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. ठेकेदार कंपनी तसेच महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी त्यांच्याकडून कामाची माहिती घेतली.
ईआयबीच्या या प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचे काम, मेट्रोचे ट्रॅक, डबे (रोलिंग स्टॉक), लिफ्ट आणि एस्कलेटर यासाठी कर्ज देणार आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे काम पहाणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. तर एएफडीच्या शिष्ट मंडळातील प्रतिनिधींनी सिग्नलिंग आणि टेलिकॉम यंत्रणा यासाठी लागणाऱ्या अर्थसाह्याबाबत चर्चा केली. स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांनी काम कधी सुरू झाले, कसे सुरू आहे, त्याचे वेळापत्रक तयार केले का यासंबधी विचारणा केली.
या पाहणी दरम्यान फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) यांच्या शिष्ठमंडळात पर्यावरण आणि सामाजिक प्रकल्प व्यवस्थापक सॅल्व्हीयन बेर्नाड, वाहतूक विभागाचे प्रकल्प प्रमुख प्रमुख मॅथ्यू व्हर्डियुअर आणि वाहतूक विभागाचे प्रोजेक्ट आॅफिसर रजनीश अहुजा यांचा समावेश होता. तर युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँक (ईआयबी) यांच्या शिष्ठमंडळात वरिष्ठ कर्ज वितरण अधिकारी सुनीता लुख्खू, सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी विभागाचे वरिष्ठ अभियंता झोल्टन डोनथ, अभियंते बिर्गीनी क्यूएलट आणि सामाजिक तज्ज्ञ वेंकट राव यांचा समावेश होता. येत्या मार्च महिन्या अखेरपर्यंत या दोन्ही वित्तीय संस्थांकडून ८४५ दशलक्ष युरो इतक्या कर्जाला मंजूर मिळून लवकरच कराराची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी सांगितले.
कास्टिंग यार्ड, लेबर कॅम्प, नदीपात्रातील प्रकल्पाचा मार्ग यांची पाहणी केली. याबरोबरच त्यांनी पर्यावरण आणि सामाजिक विषयाशी निगडीत प्रश्नासंदर्भात महामेट्रोच्या सल्लागारांशी देखील सखोल चर्चा केली.
अधिक माहिती देताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, की सध्या महामेट्रोच्या वतीने पीसीएमसी ते रेंज हिल आणि वनाझ ते सिव्हील कोर्ट या दोन्ही मार्गीकांवर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून या दोन्ही मार्गांवर महामेट्रोने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा या दोन्ही शिष्टमंडळानी घेतला. हे करीत असताना महामेट्रोने इतक्या कमी वेळेत केलेल्या कामाची प्रशंसा देखील या दोन्ही एजन्सीनी केली. या दोन्ही शिमंडळातील प्रतिनिधी मेट्रोच्या या प्रगतशील प्रकल्पाच्या गतीमुळे आनंदी आहेत. याबरोबरच तोडण्यात आलेल्या एका झाडाच्या बदल्यात १० झाडांचे रोपण आणि वृक्षांचे पुनर्रोपण यांसारख्या महामेट्रो पर्यावरणासंदर्भात घेत असलेल्या विविध उपाययोजनांचे कौतुकदेखील या शिष्टमंडळाने केले आहे.