Satish Wagh : सतीश वाघ खून; आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

By नम्रता फडणीस | Updated: December 12, 2024 18:06 IST2024-12-12T18:05:23+5:302024-12-12T18:06:21+5:30

सतीश वाघ यांचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली.

Satish Wagh murder; Accused in police custody till December 20 | Satish Wagh : सतीश वाघ खून; आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Satish Wagh : सतीश वाघ खून; आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा सुपारी देऊन खून केल्याप्रकरणातील आरोपींवर अपहरण करून खून केल्याचे कलम वाढविण्यात आले . तसेच चारही आरोपींचे मोबार्इल तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत, असे तपास अधिकारी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी न्यायालयास सांगितले. दरम्यान, न्यायालयाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सतीश वाघ यांचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली. आरोपींना गुरुवारी (दि. १२) वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. फ्लॅट नंबर २०१ लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा. बजरंग नगर, बाजार तळ्या शेजारी, आव्हाळवाडी रोड, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, रा. फ्लॅट नंबर ३०५ विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) अशी आरोपींची नावे आहेत. तर पोलिस अतिश जाधव या आरोपीचा शोध घेत आहेत.

सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. या प्रकरणी मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी जवळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्याकडे खोलीत भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांच्यात वाद झाल्यामुळे अक्षयने खोली सोडली होती. या कारणावरून अक्षयने चार-पाच महिन्यांपूर्वी आरोपी पवनला वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. पवनने त्याचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांनी संगनमताने खुनाचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आरोपींनी केलेले कृत्य हे घृणास्पद व मानवी जीविताला काळिमा फासणारे आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आरोपीकडून जप्त करावयाचे आहेत. आरोपींनी पूर्व नियोजित कट रचून हा गुन्हा केला आहे. त्यांनी नक्की कट केव्हा ? कोठे ? कसा ? रचला याबाबत त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. तसेच हा गुन्हा आरोपींनी नक्की कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे? गुन्ह्यामध्ये त्यांचा इतर कोणी मुख्य सूत्रधार आहे का ? याबाबत त्यांचेकडे तपास करावयाचा आहे.

आरोपी जावळकर याने इतर आरोपींना खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिलेली आहे. हे पैसे त्याकडे कशाप्रकारे आलेले आहेत ? किंवा त्याला इतर कोणी ही रक्कम दिली याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा आसलेकर यांनी केला.

Web Title: Satish Wagh murder; Accused in police custody till December 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.