चिंचवड : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूवर सत्तूरने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:05 PM2022-04-12T12:05:00+5:302022-04-12T12:05:01+5:30
दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली
पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर तसेच सासूवर देखील सत्तूरने वार केला. यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सत्तूर जप्त केला. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे सोमवारी (दि. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
रुपाली सुभाष गायकवाड आणि मंगल दळवी असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. सुभाष नामदेव गायकवाड (वय ४०, रा. नाव्हरे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपमाला लक्ष्मण कोर्टेकर (वय ३९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ११) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण रुपाली आणि आरोपी सुभाष गायकवाड हे पती-पत्नी आहेत. तसेच जखमी झालेल्या मंगल दळवी या फिर्यादी आणि रुपाली यांच्या आई आहेत. आरोपीने पत्नी रुपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात सत्तूराने वार करून गंभीर जखमी केले. त्याचवेळी मंगल दळवी या रुपाली हिला सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने तिला देखील जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्याही डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
जखमी रुपाली आणि त्यांच्या आई मंगल दळवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपमाला कार्टेकर यांनी फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुभाष गायकवाड याला ताब्यात घेतले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.