आता कचरा वेचकांसाठी सत्याग्रह, या वयातही गप्प बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:13+5:302021-06-29T04:08:13+5:30

पुणे : स्वच्छ संस्थेने काम काढून घेऊन कंत्राटदार कंपनीला काम देण्याचा कट रचला गेलाय. एकीकडे कचरा वेचकांना कोरोनाने मारलंय ...

Satyagraha for garbage collectors will not remain silent even at this age | आता कचरा वेचकांसाठी सत्याग्रह, या वयातही गप्प बसणार नाही

आता कचरा वेचकांसाठी सत्याग्रह, या वयातही गप्प बसणार नाही

Next

पुणे : स्वच्छ संस्थेने काम काढून घेऊन कंत्राटदार कंपनीला काम देण्याचा कट रचला गेलाय. एकीकडे कचरा वेचकांना कोरोनाने मारलंय आणि दुसरीकडे पालिका मारतेय. खासगी कंत्राटदार आणायचे नाटक कशासाठी? आम्ही काय पाप केलेय? याबद्दल शरम वाटायला हवी. या वयातही मी गप्प बसणार नाही. कचरावेचकांसाठी रस्त्यावर उतरून सत्याग्रह करणार. प्रसंगी तुरुंगातही जाईन असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी दिला आहे.

स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून खासगी कंत्राटदाराला देण्याचा घाट पालिकेने घातला आहे. याविरोधात डॉ. आढाव यांनी शेकडो कचरावेचक महिलांसह आंदोलन केले. यावेळी, खासदार सुप्रिया सुळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुभाष वारे, पौर्णिमा चिकरमाने, लक्ष्मी नारायण, संस्थेच्या अध्यक्षा सुमन मोरे, सुनीती सु. र. आदी उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले, आम्ही नगरसेवक आणि नागरिकांचा पाठिंबा मिळविला आहे. पक्षानेत्यांना भेटूनही फायदा झालेला नाही. पालिका आणि आम्ही चर्चा करून ‘स्वच्छ’चा पर्याय निर्माण केला. पालिका आम्हाला पगार देत नाही. आम्हाला नोकर मानत नाही. कोविड काळात कचरा वेचकांनी काम केले. मात्र, त्यांना विमा नाही. कोरोनाचा फायदा सत्ताधारी आणि प्रशासन उचलतेय. नागरिकांकडून २५ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करणाऱ्या प्रशासनाकडून घाणीत काम करणाऱ्यांना काय दिलं जातंय? फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन चालणार नाही. प्रत्यक्षात कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे रहावे लागेल, असेही ते म्हणाले.

यावेळी सुळे म्हणाल्या, कचरा डेपोबाबत तक्रारी वाढल्या आहेत. कचरा डेपोला पाच वर्षात एक हजार कोटी रुपये दिले. मात्र, कचरा वेचकांना काम दिले जात नाही. बाबांना आंदोलनात उतरावे लागणे हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, पालिका आयुक्त, महापौरांशी चर्चा करून ‘स्वच्छ’ला काम देण्याबाबत विनंती करेन, असे सुळे म्हणाल्या.

-------------------

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता. हे काम काढून घेतले जाणार नाही. चर्चा करून निर्णय घेणार आहोत. संस्थेसोबत चर्चा करू. अन्याय होऊ देणार नाही.’’ तर, सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, ‘स्वच्छ’चे काम काढून घेण्याचा विचार नाही. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. स्वच्छ ही चळवळ असून कचरा वेचकांना सर्व साहित्य पुरविले जाईल.’’

-------

कचरा वेचकांकडून आंदोलनाचा आदर्श

कचरा वेचकांनी आंदोलनादरम्यान सुरक्षित सामाजिक अंतर राखले होते. सर्व आंदोलकांच्या तोंडावर मास्क होता. त्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी कचरा वेचकांनी कोविड काळातही आंदोलन कसे करावे याचा आदर्श घालून दिला आहे.

-------

Web Title: Satyagraha for garbage collectors will not remain silent even at this age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.