पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 01:04 PM2018-10-23T13:04:16+5:302018-10-23T13:08:24+5:30
नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षांचा पेपर गेल्या दोन दिवसांपासून परीक्षेपूर्वीच व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर या पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बीएस्सी, इंजिनिअरींगचे पेपर परीक्षेच्या अर्धा तास अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. संबंधित महाविद्यालयांकडे पेपर पाठविल्यानंतर हे प्रकार होत आहेत. नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीसाठी लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांची सत्यशोधन समिती नेमण्यात आली.
पेपर फुटीच्या तक्रारी आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुरूवातीला पेपर फुटलेच नसल्याची भुमिका घेतली होती. जे पेपर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाले ते मागील वर्षीचे असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले होते. मात्र मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी याप्रकरणी फुटलेल्या पेपरचे पुरावे विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केले. नाशिकमधील एका महाविद्यालयातून हे पेपर फुटल्याचे कोड नंबरवरून दिसून येत आहे. यापार्श्वभुमीवर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बीएस्सी पेपर फुटीचे प्रकरण ज्या महाविद्यालयामध्ये घडले तिथल्या परीक्षा केंद्र प्रमुखांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राची मान्यता काढून घ्यावी अशी कल्पेश यादव यांनी केली आहे.