पुणे महापालिका आयुक्तांचा कार्यभार सौरभ राव यांच्याकडे
By निलेश राऊत | Published: September 15, 2022 01:03 PM2022-09-15T13:03:26+5:302022-09-15T13:03:37+5:30
वैद्यकीय कारणामुळे रजेवर असलेल्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सुपूर्द
पुणे : वैद्यकीय कारणामुळे रजेवर असलेल्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी रात्री याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
विक्रम कुमार यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्त पदाबरोबरच महापालिकेचे प्रशासक पदही आहे. दरम्यान बुधवारी रात्री ( १४ सप्टेंबर) प्रशासकाची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने प्रशासक म्हणून कोण काम पाहणार, याबाबत राज्य शासनाकडून अद्याप महापालिकेला कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. महापालिका सभागृहाची मुदत १४ मार्च,२०२२ रोजी रात्री १२ वाजता संपली. त्यानंतर १५ मार्च पासून विक्रम कुमार यांनी महापालिका प्रशासक म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून कुमार हे आयुक्त पदाबरोबरच प्रशासकाच्या ही भूमिकेत आहेत.
महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अद्याप पर्यंत घोषणा झाली नसल्याने कुमार यांना मुदत वाढ मिळणार असे बोलले जात होते. मात्र वैद्यकीय रजेवर असलेल्या कुमार यांच्या आयुक्त पदाचा पदभार राव यांच्याकडे देण्यात आला असून, महापालिका प्रशासक म्हणून कोणाची नियुक होणार हे अजून राज्य शासनाने स्पष्ट केलेले नाही.