पालिका आयुक्तपदी सौरभ राव, जिल्हाधिकारीपदी नवलकिशोर राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:20 AM2018-04-17T03:20:39+5:302018-04-17T03:20:39+5:30
महापालिकेच्या आयुक्तपदी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती झाली. गेल्या चार वर्षांपासून राव पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या आयुक्तपदी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती झाली. गेल्या चार वर्षांपासून राव पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांची ‘मेडा’च्या महासंचालकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आसाम केडरचे आयएएस
अधिकारी विशाल सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राव हे २००३च्या बॅचचे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी या पूर्वी नागपूर, नंदुरबार जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिका आयुक्त आणि गोंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यावर पुण्याची जबाबदारी होती.
- एप्रिल २०१७ मध्ये डॉ. बिपीन शर्मा यांची शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती, वर्षभरातच त्यांची बदली करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तपदावर नियुक्ती झालेल्या एकाही अधिकाऱ्याला त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही, त्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. बिपीन शर्मा यांची ‘मेडा’च्या संचालकपदी बदली झाली आहे. अपंग कल्याण आयुक्त एन. के. पाटील यांचीही बदली झाली आहे. सध्या त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. सोळंकी हे पुरंदर तालुक्यातील असून, आसाम केडरमधून प्रतिनियुक्तीवर आले आहेत.
आयुक्त, जिल्हाधिकारी आज स्वीकारणार पदभार
पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत.
गेल्या चार वर्षांत केलेल्या कामाबाबत समाधानी असून, त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या. पुणे
महानगरपालिका व पीएमआरडीएबरोबर विविध विकासकामे करण्याची जाणीव झाली. पालिकेत विविध कामे प्राधान्याने करावी लागतात. पुणे व हैदराबाद ही दोन शहरे निवासासाठी योग्य असल्याचा अहवाल समोर आला आहे. परंतु, पुणे शहर राहण्यासाठी अधिक चांगले कसे होईल, यादृष्टीने नियोजन केले जाईल. पालिकेसमोर वाहतुकीचा प्रश्न असून, सार्वजनिक वाहतूक वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच पालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन गावांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक कामे केली जातील.
- सौरभ राव, मावळते जिल्हाधिकारी