सवंगड्यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:50 AM2017-07-29T05:50:09+5:302017-07-29T05:50:12+5:30
माळीण दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या तसेच माळीण गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावस्त्यांवर राहणाºया मुलांनी आपल्या सवंगड्यांच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना ताज्या केल्या
नीलेश काण्णव
घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या तसेच माळीण गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावस्त्यांवर राहणाºया मुलांनी आपल्या सवंगड्यांच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना ताज्या केल्या. त्या सांगताना आजही त्यांना गहिवरून येत आहे.
दुघर्टनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने या मुलांशी जुन्या गावातील बंद शाळेजवळ ‘लोकमत’ने संवाद साधला. या वेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळील पटांगण, लपाछपी खेळताना पायाखाली घातलेले गाव, गावातील बैलपोळा आठवतो.
आता शाळा नवीन इमारतीत भरते; परंतु, रोज या शाळेत जाण्यासाठी जुन्या गावातून जावे लागते. रस्त्याने जाताना मुलांना मातीचा ढिगारा दिसतो. मात्र त्यांच्या आवडीचे मारुती मंदिर, पटांगण, शाळेतील मित्र, गुरुजी, शाळेचे भरलेले वर्ग दिसत नाहीत.
राजश्री विजय लेंभे हिला मीराबरोबर शाळेच्या पटांगणात एकत्र खेळतानाचे दिवस आठवले. लंगडी, कबड्डी खेळतानाचे दिवस, तिच्या घरी जाऊन खाल्लेला डबा आठवतो.
चंद्रभागा कुमार लेंभे हिला मैत्रीण सुप्रिया पोटे आठवते. ‘ती माझी बेस्ट फे्रंड होती.पण आता आमचे मित्र आम्हाला भेटणार नाहीत, म्हणून खूप वाईट वाटते,’ असे ती सांगते.
प्रवीण दिलीप लेंभे याला आपला जिवलग मित्र सागर व त्याच्याबरोबर बैलपोळ्यात केलेली मजा आठवते. ‘पोळ्याच्या दिवशी सागर आणि मी बैलांना ओढ्यावर नेऊन धुवायचो, सजवायचो, गावातून निघणाºया बैलांच्या मिरवणुकीत नाचायचो आणि संध्याकाळी पोटभोर पोळ्या खायचो. पोळा आला की मला सागर आठवतो’, अशी आठवण प्रवीणने सांगितली.
त्याचबरोबर प्रज्वल दिनेश लेंभे, दीपाली विजय लेंभे, जयश्री बुधाजी लेंभे, सचिन संदीप लेंभे, संकेश बुधाजी लेंभे या मुलांनी गावातील यात्रा व बैलपोळ्याविषयीच्या आठवणी सांगितल्या.