‘सवाई’मध्ये ‘आनंदवन’ ठरतेय लक्षवेधक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:01 AM2018-12-15T04:01:34+5:302018-12-15T04:02:02+5:30
पाणीप्रश्नाकडे वेधलं जातंय लक्ष; ‘दालनावर कार्यकर्त्यांचा संवाद
पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात दरवर्षी रागांवर आधारित अत्तरे, टी-शर्ट आणि कॅसेट्स सीडीज यांचे स्टॉल पाहायला मिळतात. मात्र यंदाच्या वर्षी एक हटके स्टॉल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तो आहे, ‘आनंदवन’चा! या दालनावरचे कार्यकर्ते संगीतावर नव्हे, तर चक्क ‘पाणी’प्रश्नावर रसिकांशी संवाद साधत आहेत. ‘आनंदवन भूजल-शाश्वत सहयोग’ या हाती घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी ‘सवाई’सारखे अभिजात माध्यम त्यांनी निवडले आहे.
‘पाणी’ हा सध्याचा अत्यंत ज्वलंत विषय बनला आहे. पुण्याच्या पाण्यातही ५० टक्के कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. भविष्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. ही सर्व पार्श्वभूमी पाहता पाणी समस्येचे मूळ नक्की कशात दडले आहे, हे जाणून घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे. नेमक्या याच मुद्यावर ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ची संकल्पना आखण्यात आली आहे. भारताचा वार्षिक भूजल उपसा २५१ अब्ज घनमीटर आहे. जो जागतिक वार्षिक भूजल उपशाच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
‘भूजल’ ही वैयक्तिक मालमत्ता नसून, सामूहिक संसाधन आहे याबद्दलच्या अज्ञानातून होत असलेला अतिरेकी वापर आणि अनिर्बंध भूजल उपसा आणि भूजलविज्ञानाचा दाखला न देता राबवले जाणारे पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम या गोष्टींमध्ये पाणी समस्यांचे मूळ आहे, याकडे कार्यकर्ते नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.
त्यासाठी ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’अंतर्गत प्रत्येक राज्यातल्या किमान एका पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये जलसंसाधनांच्या व्यवस्थापनाबरोबरच ‘लोकेशन स्पेसिफिक’ आणि ‘नीड बेस’ दृष्टिकोनातून पाण्याशी निगडित अशा सार्वजनिक आरोग्य, शेती, रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण या अविभाज्य क्षेत्रात कृती कार्यक्रम राबविणे आणि भूजलाच्या शाश्वत आणि समन्यायी व्यवस्थापनाचा सर्वसमावेशी कायदा देशात लागू होण्यासाठी प्रयत्न करणे हा आमचा संकल्प असल्याचे कार्यकर्ते भास्कर अच्युत गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘सवाई’मध्ये येणारा वर्ग हा बहुतांश ‘अभिजन’ असतो. त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचविण्यासाठी सवाईमध्ये दालन लावण्याची विनंती आम्ही आयोजकांना केली होती आणि त्यांनीही आमचे काम पाहून मान्यता दिली. यापुढे विविध महोत्सवातही आम्ही स्टॉल मांडणार आहोत.
- भास्कर अच्युत गोखले,
कार्यकर्ते