भरपूर पैसे माेजा अन् थेट ॲडमिशन मिळवा; विद्यार्थी-पालकांना लाखाे रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:42 AM2022-12-05T05:42:50+5:302022-12-05T05:43:21+5:30
मेडिकल, इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेत एजंटांचा सुळसुळाट
पुणे : पाल्याला चांगल्या महाविद्यालयात, आवडीच्या शाखेत प्रवेश मिळावा म्हणून पालक वाटेल ते करायला तयार असतात. याचाच फायदा घेत एजंटगिरी बाेकाळली आहे. ‘मेडिकल, इंजिनीअरिंग किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीट मिळत नाही? आम्हाला फक्त काही हजार ते लाख रुपये द्या आणि तुम्हाला ‘ओळखी’तून सीट मिळवून देताे’ असे सांगत भुरळ घालत लूट सुरू आहे.
मेडिकल व इंजिनीअरिंगला जास्त मागणी आहे. पुण्यातील नावाजलेल्या संस्थांमध्ये ॲडमिशन मिळावे, ही पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही इच्छा असते. ज्यांना मार्क कमी आहेत किंवा जे पुण्याबाहेर राहणारे आहेत आणि प्रवेश घेऊ इच्छितात, अशांना हे एजंट हेरतात आणि संपर्क साधतात.
अशी असते ‘माेडस ऑपरेंडी’
पुण्यात यायचे. एक आलिशान ऑफिस थाटायचे आणि काॅल करण्यासाठी मुलींना ठेवायचे. त्यामधून जे गळाला लागतात त्यांना ऑफिसला किंवा आलिशान हाॅटेलमध्ये बाेलवून मार्केटिंग करून पटवून द्यायचे, अशी यांची माेडस ऑपरेंडी असते.
ओळखीतून नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मॅनेजमेंटने ठरवलेल्या एकूण सीटच्या दहा टक्के रक्कम (जी ५० हजार ते २ लाख रुपये असते) भरायला सांगतात. प्रवेश झाला तर ठीक; परंतु प्रवेश न मिळाल्यास घेतलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ करतात. यामध्ये बहुतेक करून बिहार, झारखंडच्या एजंटांचा सुळसुळाट आहे.
असा आला अनुभव...
माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी नाेटबुक एज्युकेशन या एजन्सीने पुण्यातील नामांकित काॅलेजमध्ये इलेक्ट्राॅनिक अँड टेलिकम्युनिकेशन विषयाला ॲडमिशन करून देण्यासाठी साडेतीन लाख रुपये मागितले. आधी पन्नास हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर फाेन केल्यास पुन्हा-पुन्हा फाेन करू नका, पैसे परत देताे, असे सांगायचे. २० नाेव्हेंबर ही ॲडमिशनची शेवटची तारीख हाेती. शेवटी ॲडमिशन झालेच नाही. नंतर त्यांनी फाेन उचलणेच बंद केले. - पृथ्वीराज पाटील, पालक, जळगाव
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"