बालगंधर्वांचा वारसा जतन करावा
By admin | Published: July 17, 2017 04:29 AM2017-07-17T04:29:06+5:302017-07-17T04:29:06+5:30
बालगंधर्वांनी प्रत्येकाच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यांनी रसिकांना जे सांस्कृतिक दर्शन घडविले आहे, त्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बालगंधर्वांनी प्रत्येकाच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यांनी रसिकांना जे सांस्कृतिक दर्शन घडविले आहे, त्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही. त्या वेळी तंत्रज्ञान नसल्याने त्यांच्या कलाकृती सर्वदूर पोहोचल्या नाहीत. आता हा वारसा जतन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी व्यक्त केले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचे वितरण प्रभू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित यांना यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमात इतर पुरस्कारांमध्ये या वर्षीचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याच्या अप्पा बाबलो गावकर, तर डॉ. सावळो केणी पुरस्कार डोंबीवलीच्या धनंजय पुराणिक यांना देण्यात आला. गोविंद बल्लाळ पुरस्काराने मुंबईच्या शुभदा दादरकर, काकासाहेब खाडिलकर पुरस्कारने पुण्याच्या कविता टिकेकर, खाऊवाले पाटणकर पुरस्काराने गोव्याच्या राया कोरगावकर, रंगसेवा पुरस्काराने पुण्याचे सयाजी शेंडकर आणि गोव्याचे लक्ष्मण म्हाम्बरे यांना गौरविण्यात आले. प्रत्येकी ५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे, या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, द. कृ. लेले पुरस्काराने उल्हास केंजळे, बाल कलाकार निर्झरी चिंचाळकर आणि कार्तिकी भालेराव यांना सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या महाराष्ट्र राय संगीत नाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमाकांच्या विजेत्या राधाकृष्ण कलामंदिर या संस्थेलाही या वेळी गौरविण्यात आले. या वेळी प्रभू यांच्या हस्ते ‘गंधर्वरंग’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पणशीकर यांनीही पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साखवळकर यांनी प्रास्ताविक केले.
अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन, तर अवंती बायस यांनी आभार मानले.