केवळ जबाबदारी नको, पुरुषांच्या तक्रारींनाही न्याय द्यावा, सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 09:30 IST2024-12-23T09:28:38+5:302024-12-23T09:30:25+5:30
अपयशी विवाह, खोट्या तक्रारी आणि कायद्यांच्या दुरुपयोगामुळे अनेक पुरुष मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करत आहेत

केवळ जबाबदारी नको, पुरुषांच्या तक्रारींनाही न्याय द्यावा, सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनची मागणी
पुणे: अलीकडेच अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारखी दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनने संसदीय चौकशी समितीची स्थापना करण्यात यावी, न्यायिक प्रणालीत सुधारणा करावी, खोट्या खटल्यांवर कठोर कारवाई करणे, पुरुषांच्या आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशा विविध मागण्या केल्या आहेत.
पुरुषांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातून मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण होत असल्याने न्यायव्यवस्थेत सुधारणा आणि पुरुषांच्या हक्कांसाठी नागरिक आणि 'सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन'चे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत मागणी केली. कार्यकर्त्यांनी भारताचे सरन्यायाधीश आणि जिल्हा न्यायालयांचे प्रमुख न्यायाधीश यांना २५० हून अधिक पत्रे आणि फुलांचे संच पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी न्यायव्यवस्थेने निष्क्रियता संपवून सक्रियतेने काम करावे, अशी विनंती केली आहे. पुरुषांच्या समस्या यामध्ये कौटुंबिक वादांमध्ये भेडसावणाऱ्या अन्यायाकडे न्यायालयाने संवेदनशीलतेने पाहावे, अशीही मागणी करण्यात आली.
भारतीय समाजात पुरुषांना कुटुंबातील तणावपूर्ण घटनांमध्ये भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अपयशी विवाह, खोट्या तक्रारी आणि कायद्यांच्या दुरुपयोगामुळे अनेक पुरुष मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करतात. अलीकडे, अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारख्या घटना या समस्यांचे गांभीर्य अधोरेखित करते. त्यामुळे फाउंडेशनने न्यायव्यवस्थेत सुधारणा आणि पुरुषांच्या हक्कांसाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
पुरुषांना केवळ जबाबदारीसाठी वापरण्याऐवजी त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळायला हवी, तसेच न्यायव्यवस्थेने पुरुषांच्या बाजू समजून घेणे आवश्यक आहेत. केवळ त्यांना प्रत्येक गोष्टीत देषी ठरवणे चुकीचे आहे.- पांडुरंग कट्टी, सह-संस्थापक, एसआयएफएफ