काळ आला होता पण..!ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या १८ महिन्यांच्या बाळाला वडिलांनी वाचवले,कात्रज येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 03:54 PM2020-09-12T15:54:48+5:302020-09-12T16:00:10+5:30
बाळाची भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू
अभिजीत डुंगरवाल
कात्रज: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. कात्रज भागात हे प्रमाण अधिक आहे शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने कात्रज तलाव काल भरून वाहू लागला. यामुळे कात्रज तळ्या शेजारी असलेल्या शेलारमळ्यात नाल्याचे पाणी घुसले. त्यात एक १८ महिन्यांचे बाळ पाण्यात वाहून चालले होते. परंतु, वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहून जात असलेल्या बाळाला वाचवले. सध्या भारती विद्यापीठ येथील दवाखान्यात या बाळाची जीवन- मरणाची लढाई सुरु आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, शेलार मळ्यातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे,तसेच नाले सफाई न झाल्यामुळे नाल्याची रुंदी व खोली कमी झाली असल्यामुळे थोडाही पाऊस झाला की पाणी या भागात घुसते. गँबेल वाँल मुळे हा १२ मीटरचा ओढा जागेवर फक्त ४ मीटर राहिलेला आहे. कालच्या झालेल्या पावसाने सुमारे ४ फुट पाणी या भागात घुसले असल्याचे प्रत्यक्षदर्शी संदीप कोष्टी यांनी सांगितले.या पाण्यामध्ये संदेश भोरे हे १८ महिन्यांचे बाळ वाहून चाललेे होते. सतीश भोरे यांच्या बंगल्यामध्ये पाणी घुसल्यामुळे भोरे हे बाहेर असलेली आपली दुचाकी वाहुन जाऊ नये यासाठी पाण्यात उतरले,त्यांच्यापाठोपाठ संदेश देखील बाहेर आला आहे हे त्यांना माहीत नव्हते.रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.संदेश वाहून जाऊ लागल्यामुळे तो ओरडला तेव्हा सतीश भोरे यांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी गाडी सोडुन आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धाव घेतली.सुमारे १५ ते २० फुट हे बाळ वाहून गेले होते.नंतर त्याला तातडीने भारती विद्यापीठ येथे दाखल करण्यात आले आहे.नाका-तोंडात पाणी गेल्याने हा चिमुरडा जीवन-मरणाची लढाई लढत आहे.
नाले सफाईच्या नावाखाली कोटी रुपये उचलणारे ठेकेदार व त्यांच्यावर निरीक्षक म्हणून काम करणारे अधिकारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे अनेकांना आपले प्राण धोक्यात घालावे लागत आहेत.
याविषयी ड्रेनेज विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्वाती बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नाले सफाई झालेली आहे.गार्डन विभागाच्या अंतर्गत या नाल्यावर जेएन.आर.यु.योजनेमध्ये दोन्ही बाजूनी गँबेन वाॅल केल्यामुळे ओढ्याची लांबी कमी झालेली आहे.त्यामुळे नेहमीच पाणी शेलार मेळ्यात घुसत आहे.वॉलवर असलेल्या जाळीमुळे सर्व भिंत काढणे शक्य नाही.पुढील काळात शेलार मळ्यात पाणी जाऊ नये यासाठी उपाय योजना सुरु केल्या आहेत.