टेकड्या वाचवा, तरच मत देऊ ! पुण्यातील टेकडी प्रेमींचा निर्धार

By श्रीकिशन काळे | Published: October 20, 2024 07:01 PM2024-10-20T19:01:02+5:302024-10-20T19:01:26+5:30

पुण्यातील पर्यावरणाचा प्रश्न हा विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात यावा आणि त्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे

Save the hills vote only The determination of hill lovers in Pune | टेकड्या वाचवा, तरच मत देऊ ! पुण्यातील टेकडी प्रेमींचा निर्धार

टेकड्या वाचवा, तरच मत देऊ ! पुण्यातील टेकडी प्रेमींचा निर्धार

पुणे : हिरव्यागार टेकड्या ही पुण्याची ओळख आहे. परंतु पुणे वेगाने वाढत असून टेकड्यांवरील अतिक्रमणेही वाढली आहेत. या टेकड्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यामुळे टेकड्या वाचविण्यासाठी व टेकडीवरील प्रस्तावित तीन प्रकल्प रद्द करण्यासाठी जो उमेदवार काम करेल, त्यांनाच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही मतदान करू, असा निर्धार टेकडी प्रेमींनी रविवारी (दि.२०) केला. मोठ्या संख्येने पुणेकर टेकडीवर आले होते आणि त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला.

वेताळ टेकडीसाठी पुणेकरांनी वेळोवेळी संरक्षण आणि जतन करण्यासाठी आंदोलने केली आहेत. आता विधानसभा निवडणूक आल्याने टेकडीप्रेमी एकत्र येत असून, ती वाचविण्यासाठी जो उमेदवार काम करेल, त्यालाच आम्ही मत देऊ, असा निर्धार नागरिकांनी यावेळी केला. रविवारी सकाळी टेकडीप्रेमींनी आपला मारुती ते खाणीपर्यंत पदयात्रा काढली. यामध्ये सहभागी झालेल्या टेकडीप्रेमींनी ‘टेकड्या वाचवा’चा संदेश लिहिलेला फलक हाती घेतला होता. सोबतच घोषणाही दिल्या. याप्रसंगी वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे सदस्य सुमिता काळे, सुषमा दाते, प्रदीप घुमरे आदी उपस्थित होते. टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी या वेळी टेकड्या वाचवासाठी जो उमेदवार काम करेल, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले. पुण्यातील पर्यावरणाचा प्रश्न हा विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात यावा आणि त्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असेही स्पष्ट केले.

ही आश्वासने घ्या !

१) पीएमपी सक्षम करावी, मेट्रोचे जाळे विस्तृत करावे, सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी
२) पुण्याच्या विकास आराखड्यातून वेताळ टेकडीवरील नियोजित तिन्ही प्रकल्प रद्द करा

३) वेताळ टेकडी व इतर टेकड्यांना नैसर्गिक वारसास्थळे घोषित करावे
४) पुण्यातील सर्व टेकड्या, डोंगर हे नो डेव्हलपमेंट झोन म्हणून जाहीर करा

भूजलपातळी वाढण्यासाठी प्रयत्न करा!

शहरातील ओपन अॅमेनिटीज स्पेस सक्तीने कायमस्वरूपी संरक्षित करावी. त्यामुळे भूजलपातळी वाढण्यासाठी मदत होईल. शहरामध्ये सुमारे ८०० अॅमेनिटीज स्पेस आहेत. २०० हून अधिक बागा आणि सरकारी कार्यालयाच्या समोर मोकळ्या जागा आहेत. त्या सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुण्याची भूजलपातळी चांगली राहील, अशी मागणी केली.

येत्या विधानसभेला पुणेकरांनी जो पर्यावरणासाठी काम करेल, वेताळ टेकडीच्या संरक्षणासाठी काम करेल, त्यालाच मतदान करावे. आपला उमेदवार चांगला निवडावा, कारण आपण पाहतोय पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. टेकडीवरील सर्व प्रकल्प रद्द करण्यासाठी पुणेकरांनी या मतदानाचा उपयोग करून घ्यावा. - सुषमा दाते, सदस्य, वेताळ टेकडी कृती बचाव समिती

Web Title: Save the hills vote only The determination of hill lovers in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.