हेल्मेटसक्तीविरोधात ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 04:31 PM2019-01-01T16:31:51+5:302019-01-01T17:00:58+5:30
पोलिसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : हेल्मेट न घालणाºया दुचाकी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. समितीच्या वतीने दि. ३ जानेवारी रोजी हेल्मेट न घालता दुचाकीवर जाऊन पोलिस आयुक्तांना हेल्मेट सक्ती न करण्याबाबत निवेदन दिले जाणार आहे. तसेच त्यानंतरही हेल्मेटसक्तीविरोधात लढा कायम ठेवण्याचा निर्धार समितीने केला.
पोलिसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून जनजागृती तसेच ठिकठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली. तर दि.१ जानेवारीपासून कारवाईचा वेग वाढविला जाणार आहे. या सक्तीला समितीकडून सुरूवातीपासूनच विरोध करण्यात आला. पण पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवल्याने आता समितीकडून रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी समितीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाठक, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, श्याम देशपांडे, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, मंदार जोशी आदी उपस्थित होते.
याविषयी बोलताना पाठक म्हणाले, पोलिस आयुक्तांनी नागपुरमध्ये केलेला हेल्मेटसक्तीचा प्रयत्न आता पुण्यात लादत आहेत. हेल्मेटसक्तीला विरोधाची आमची भुमिका अनेक वर्षांची आहे. शहरात सुमारे २५ लाख दुचाकी आहेत. या सर्वांना हेल्मेट उपलब्ध आहेत का? केवळ दंड करून पैसे उकळण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे दि. ३ जानेवारी रोजी सविनय कायदेभंग आंदोलन केले आहे. यामध्ये हेल्मेटसक्तीला विरोध करणारे नागरिक गांजवे चौक येथील पत्रकार भवनपासून पोलिस आयुक्तालयापर्यंत दुचाकी फेरी काढतील. कोणीही दुचाकीस्वार हेल्मेट घालणार नाही. त्यानंतर पोलिस आयुक्तांना हेल्मेटसक्ती न करण्याचे निवेदन दिले जाईल.
कायद्यामध्ये योग्य बदल करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम खासदार, आमदारांचे आहे. त्यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी नागरिकांनी हेल्मेटसक्ती विरोधी मोहिमेत सक्रीयपुणे सहभागी व्हायला हवे, असे वेलणकर यांनी सांगितले. वाहतुक पोलिसांच्या ‘सतर्क पुणेकर’ अॅपवर पोलिसांनी केलेल्या वाहतुक नियमभंगाची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर अपलोड करण्याचे आवाहन खर्डेकर यांनी केले. केवळ डोक्याला मार लागल्याने मृत्यू होण्याची प्रमाण अत्यल्प आहे. पोलिसांकडून याबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभुल केली जात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला.