इलेक्ट्रिक बसमुळे महिन्याला ३० लाखांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:17 AM2019-04-03T01:17:51+5:302019-04-03T01:18:13+5:30

डिझेल बससाठी ३८ लाख : ई-बससाठी केवळ ८ लाखांचा खर्च

Saving of 30 lakhs per month due to electric bus | इलेक्ट्रिक बसमुळे महिन्याला ३० लाखांची बचत

इलेक्ट्रिक बसमुळे महिन्याला ३० लाखांची बचत

Next

पुणे : शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या प्रमुख उद्देशाने भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसमुळे इंधन खर्चामध्ये मोठी बचत झाली आहे. पीएमपीच्या ताफ्यात एका महिन्यापूर्वी दाखल झालेल्या २५ इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगसाठी एक महिन्यासाठी ८ लाख रुपयांचा वीजखर्च झाला आहे. त्याच वेळी डिझेलवर चालणाऱ्या २५ बससाठी दर महिन्याला तब्बल ३७ ते ३८ लाख रुपयांचा खर्च येत होता.

गेल्या काही वर्षांत शहरात वाढत असलेल्या प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या व पीएमपीच्या संचालनामध्ये निर्माण झालेली कोट्यवधी रुपयांची तूट कमी करण्यासाठी पीएमपीसाठी ई-बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ८ फेबु्रवारी २०१९मध्ये २५ ई-बस पुणेकरांच्या सेवेत दाखल झालेल्या असून, या बससाठी भेकराईनगर आणि निगडी येथे चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. या बस सार्वजनिक सेवेसाठी असल्याने त्यांना महावितरणकडून प्रति युनिट ५ रुपये ६२ पैसे दर निश्चित केला असून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत या बस चार्जिंग केल्यास या दरात आणखी दीड रुपयाची सवलत आहे. त्यामुळे मागील महिन्यात या बसच्या चार्जिंगपोटी भेकराईनगर येथील स्टेशनला १५ बससाठी ५ लाख, तर निगडी येथील स्टेशनला १० बससाठी ३ लाख रुपयांचा खर्च आला असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाने स्पष्ट केले. वीजबिल भरण्याची जबाबदारी पालिकेवर असेल.

इंधन खर्चातील बचत महापालिकेच्या पथ्यावर
पीएमपीच्या संचालनामध्ये निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेला विकासकामांचा निधी कमी करून पीएमपीला द्यावा लागत आहे.

या संचालन तुटीमध्ये इंधन दरवाढीचादेखील मोठा वाटा आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या डिझेल बसला प्रति ३ किलोमीटरसाठी १ लिटर डिझेलची आवश्यकता भासते. तर, या बस दर दिवशी सरासरी २०० ते २१० किलोमीटर धावतात.
प्रति दिन ७० रुपयांप्रमाणे तब्बल ४,९०० ते ५,००० रुपयांचे डिझेल लागते. मात्र, त्याच वेळी ई-बसच्या चार्जिंगसाठी प्रति दिन २०० ते २१० किलोमीटरसाठी कवेळ ९५० ते १ हजार रुपयांचा वीजखर्च येत आहे. त्यामुळे इंधन खर्चात पीएमपी आणि दोन्ही महापालिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 

Web Title: Saving of 30 lakhs per month due to electric bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.