सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवोपक्रमातील "लीडर"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:47+5:302021-05-09T04:11:47+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ''लीडर्स'' चा दर्जा ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ''लीडर्स'' चा दर्जा देण्यात आला आहे. तसेच नवोपक्रमासाठी लागणारा ''सीड फंड'' सुद्धा या संस्थेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ नवोपक्रमातील ''लीडर'' ठरले आहे.
महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्था ही काही सार्वजनिक विद्यापीठे, स्टार्टअप सेन्टर आणि कंपन्यांना प्रोत्साहन देते. या संस्थेने नुकतीच आढावा बैठक घेऊन स्टार्टअप सेंटरचे बिगीनर्स, एमर्जिंग आणि लीडर्स या तीन प्रकारात वर्गीकरण केले. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आत्तापर्यंतची कामगिरी पाहून विद्यापीठाला ''लीडर्स''चा दर्जा देण्यात आला.
नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या माध्यमातून पुणे तसेच आसपासच्या स्टार्टअप बरोबर काम चालते. विभागातर्फे अनेक नवोपक्रम केंद्र तयार करण्यात आले असून, २७५ पेक्षा अधिक महाविद्यालयांशी विद्यापीठ संलग्न आहे. विद्यापीठ इन्ट्रप्रेनारशीप इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, अहमदाबाद, पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनोव्हेशन सेल तसेच काही संस्थांशी विभाग जोडला गेला आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहित केले जाते.
नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, विद्यापठाला मिळालेला हा दर्जा तळागाळातील नवकल्पनांना चांगले मार्गदर्शन करून पुढे नेण्यासाठी फार उपयुक्त आहे.
-------------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने योग्य नियोजन करत स्टार्टअपवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामुळे भविष्यात नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांच्या दिशेने आपली प्रगती होईल. हा दर्जा मिळणे ही यातील एक छोटी पायरी असून भविष्यात त्यात मोठे काम करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
- प्रा.डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--------------
मेंटॉरशिप प्रोग्रामचे आयोजन
इनोफेस्ट २०२१ मधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्टार्टअप सुरू होण्याआधी विस्तृत मार्गदर्शन मिळण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांसाठी ''मेंटॉरशिप प्रोग्राम''चे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रोग्राम ७ मे ते १७ जून या कालावधीत असून या मेंटॉरशिप प्रोग्रॅमला सुरुवात झाली. या कार्यक्रमात ६० कंपन्या सहभागी झाल्या असून हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने होत आहे.
-------