सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाेगस पदवी प्रमाणपत्राने खळबळ, बँकेत मिळविली नाेकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:51 AM2024-05-31T10:51:38+5:302024-05-31T10:52:05+5:30

परीक्षा विभागाने केलेल्या पडताळणीत प्रमाणपत्र खाेटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावे बाेगस प्रमाणपत्र देणारे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...

Savitribai Phule Pune University Bagus Degree Certificate Excitement, Bank Job | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाेगस पदवी प्रमाणपत्राने खळबळ, बँकेत मिळविली नाेकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाेगस पदवी प्रमाणपत्राने खळबळ, बँकेत मिळविली नाेकरी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून बी.काॅम. पदवी उत्तीर्ण असल्याची बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सापडल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या खाेट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या व्यक्तीने एका नामांकित खासगी बँकेत नाेकरी मिळविली असून, मागील तीन वर्षांपासून ताे तेथे कार्यरत आहे.

परीक्षा विभागाने केलेल्या पडताळणीत प्रमाणपत्र खाेटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावे बाेगस प्रमाणपत्र देणारे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दाैंड येथील के. जी. कटारिया काॅलेजमधून बी.काॅम. पदवीचे सहा सत्र उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका; तसेच पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे ठाणे येथील खासगी बँकेत नाेकरी मिळविली. मागील तीन वर्षांपासून ताे बँकेत वाहन कर्ज विभागात कार्यरत आहे. बँकेतील व्यवस्थापकाने तरुणाच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी चार महिन्यांपूर्वी दाैंड येथील काॅलेजशी संपर्क साधला असता काॅलेज प्रशासनास विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागातही गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांची पडताळणी केली. यात ते खाेटे असल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात प्रमाणपत्र कक्षाचे उपकुलसचिव ज्ञानेश्वर भाेसले यांनी चतु:शृंगी पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'झेडपी'च्या विद्यार्थ्यांना मिळणार ISRO ला भेट देण्याची संधी; डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव

गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रात तफावत :

पदवी प्रमाणपत्रावर बी.काॅम. पदवी मे २०१८ मध्ये उत्तीर्ण झाल्याचे नमूद आहे. काॅलेजने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०१२, १३ आणि १४ या कालावधीमधील गुणपत्रिका असून ताे २०१४ मध्ये पदवी उत्तीर्ण झाल्याचे त्यावर नमूद आहे.

विद्यापीठाच्या नावे बनावट संकेतस्थळ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य असलेल्या एका संकेतस्थळावरून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा तरुण करीत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या नावे खाेटे संकेतस्थळ विकसित करून बनावट गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र देणारे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बँक व्यवस्थापकाने चार महिन्यांपूर्वी आमच्याशी संपर्क साधला. व्यक्तीने २०१२, १३ आणि १४ या तीन वर्षांच्या कालावधीत बी.काॅम. पदवी उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका दिल्या आहेत. मात्र, तेव्हा काॅलेजमध्ये काॅमर्स पदवी अभ्यासक्रम सुरू झालेला नव्हता. त्यामुळे सदर व्यक्ती आमचा विद्यार्थी नाही. गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र खाेटे आहे, अशी माहिती आम्ही ई-मेलद्वारे बँकेला पाठविली आहे.

- डाॅ. एस. एम. समुद्र, प्राचार्य, के. जी. कटारिया काॅलेज, दाैंड

परीक्षा विभागाने केलेल्या पडताळणीत तरुणाकडील सत्र १ ते ६ च्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून पाेलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

- डाॅ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे; तसेच ठाणे शहरातील कापूरबावडी पाेलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

- युवराज नांद्रे, पाेलिस निरीक्षक, चतु:शृंगी पाेलिस ठाणे

Web Title: Savitribai Phule Pune University Bagus Degree Certificate Excitement, Bank Job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.