SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मंगळवारापासून बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 08:16 PM2021-12-20T20:16:47+5:302021-12-20T20:18:52+5:30
'बंद'मुळे विद्यापीठाच्या कामकाजावर होणार परिणाम
पुणे: पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यामुळे मंगळवारपासून (२१ डिसेंबर) बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे उद्यापासून (मंगळवार) विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. केवळ शासनाच्या पक्षपाती भूमिकेमुळे विद्यापीठीय/ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, असं सेवक संयुक्त कृती समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राज्यभरातील विद्यापीठांत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने २ दिवसांपूर्वीच बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने डॉ. सुनील धिवार यांनी दिली. या संपाबाबत कर्मचारी संघटनेने आज दुपारी बैठक बोलाविली होती त्यात हा निर्णय झाला.
काय आहेत मागण्या-
- राज्यातील अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाची 58 महिन्यांची थकबाकी अदा करावी.
- अकृषी विद्यापीठातील पदांना सातवा वेतन आयोग लागू करावा.
- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दहा-वीस व तीस वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी.