सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 07:49 PM2021-07-07T19:49:14+5:302021-07-07T19:52:24+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात प्रशासकीय व आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने अतुल पाटणकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी चार्टर्ड अकाउंटंट अतुल पाटणकर (वय ५३) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, बहिण, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह सर्व अधिकारी व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विद्यापीठात वित्त अधिकारी म्हणून त्यांनी अडीच वर्षे कामकाज पाहिले. स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यांच्या जाण्याने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, पाटणकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक स्थगित करण्यात आली.
---------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात प्रशासकीय व आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने अतुल पाटणकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जाण्याने विद्यापीठाची न भरून येणारी हानी झाली आहे.
- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ