सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; आर्थिक स्थिती बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:06+5:302021-02-05T05:00:06+5:30
पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ आणि राज्यातील सर्वात सधन विद्यापीठ अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आर्थिक ...
पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ आणि राज्यातील सर्वात सधन विद्यापीठ अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आर्थिक स्थिती चांगलीच बिघडली आहे. विद्यापीठाकडील ६०० कोटींच्या ठेवी ३०० कोटींपर्यंत कमी झाल्याची धक्कादायक माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत गुरुवारी समोर आली. त्यामुळे यापुढील काळात महाविद्यालयांच्या विकासकामांना कात्री लावावी लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाचे उत्पन्न कमी झाले आहे. विद्यापीठाच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातही घट झाली. तसेच विद्यापीठाचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचे प्रमाण यात मोठी तफावत निर्माण झाली. एकूणच विद्यापीठाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्यापीठाच्या ठेवी निम्म्याने घटल्याचे गुरुवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दिसून आले. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तसेच विद्यापीठाने यापुढील काळात खर्चात काटकसर करावी. उत्पन्नवाढीसाठी नवीन स्रोत तयार करावेत. त्यासाठी विद्यापीठाचे क्रीडांगण, क्रीडांगणातील अत्याधुनिक सुविधा, संशोधन प्रकल्प, अभ्यागत निवास, जॉगिंग पार्क, प्रयोगशाळा आदींचा वापर करावा, अशा सूचना व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी दिल्या.
विद्यापीठाचे उत्पन्न घटल्याने यापुढे संलग्न महाविद्यालयांच्या विकासकामांच्या खर्चांना कात्री लावावी. मात्र, विद्यार्थी हितासाठी आणि संशोधनासाठी निधी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, असेही निर्देश व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या बांधकामास परवानगी दिली. मात्र, निधी घटल्याने विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक येथील उपकेंद्राच्या विकासकामांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
--
अनेक वर्षांपासून विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. तसेच विद्यापीठाच्या उत्पन्नात घट होत असून, खर्चात वाढ होत आहे. विद्यापीठाच्या ठेवी घटल्याने गुरुवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ