सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सापडेना अधिष्ठाता नियुक्तीचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 07:00 AM2019-11-03T07:00:00+5:302019-11-03T07:00:04+5:30

विद्यापीठच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित..

Savitribai Phule Pune University no time for Appointment of dean | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सापडेना अधिष्ठाता नियुक्तीचा मुहूर्त

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सापडेना अधिष्ठाता नियुक्तीचा मुहूर्त

googlenewsNext
ठळक मुद्देमुलाखत घेतल्यानंतर काही तासात संबंधित व्यक्तीची निवड केली जाते जाहीर शासनाकडून पद भरतीला मान्यता मिळत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून नाराजी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या अधिष्ठाता पदासाठी सप्टेबर व आॅक्टोबर महिन्यात तज्ज्ञ समितीकडून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप विद्यापीठ प्रशासनाला अधिष्ठात्यांची नावे जाहीर करण्यासाठी मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे विद्यापीठच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहुतांश शैक्षणिक कामकाज पाहण्याची जबाबदारी अधिष्ठात्यांकडे आहे. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने तीन अधिष्ठात्यांची निवड प्रक्रिया नियमानुसार राबवून ती पूर्ण केली.त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आणि 9 व 10  सप्टेबर रोजी मानवविज्ञान तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या.तसेच ऑक्टोबर महिन्यात  विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी मुलाखती झाल्या.या सर्व विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांची निवड 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार होती.मात्र,विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर आलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे अधिष्ठात्यांची नावे जाहीर झाली नाहीत.
विद्यापीठाने नियुक्त केलेल्या निवड समितीने पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यातील अंतिम उमेदवारांची नावे विद्यापीठाकडे सुपूर्द केली आहेत.परंतु,विद्यापीठाने ही नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.त्यामुळे शिक्षण वर्तुळात उलट -उलट चर्चा केली जात आहे. विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठातापद नाशिक जिल्ह्यात प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या अधिसभा सदस्याला मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे पुण्यातील एका नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटंंच्या संचालकाकडे जाण्याची शक्यता आहे. तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदावर यापूर्वी विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिलेल्या व्यक्तीचीच निवड होईल,अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात काही दिवसांपासून सुरू आहे.
एखाद्या शैक्षणिक पदावरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखत घेतल्यानंतर काही तासात संबंधित व्यक्तीची निवड जाहीर केली जाते. परंतु,विद्यापीठाने गेल्या दोन महिन्यापासून अधिष्ठात्यांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. एकीकडे शासनाकडून पद भरतीला मान्यता मिळत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून नाराजी व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे विद्यापीठाकडूनच निवड झालेल्या व्यक्तिंची नावे जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यपध्दतीवर सवाल उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Savitribai Phule Pune University no time for Appointment of dean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.