सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रॅंकींग घसरली; देशातील सर्वाेत्कृष्ठ शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर
By प्रशांत बिडवे | Published: June 5, 2023 04:40 PM2023-06-05T16:40:10+5:302023-06-05T16:40:26+5:30
देशातील शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत पुणे विद्यापीठाची पिछेहाट झाली असली तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक
पुणे : नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिग फ्रेमवर्कने २०२३ मधील देशातील सर्वाेत्कृष्ठ शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली. एकुण शैक्षणिक संस्था (ओव्हरऑल) गटाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ३५ व्या आणि विद्यापीठांच्या गटात १९ व्या स्थानी घसरण झाली आहे. गतवर्षी ओव्हरऑल रॅंकिंगमध्ये पुणे विद्यापीठ २५ व्या क्रमांकावर होते तर २०२० मध्ये विद्यापीठ गटात नवव्या स्थानावर हाेते. पुणे विद्यापीठाची गत तीन वर्षांपासून रॅंकिंगमध्ये सातत्याने घसरण हाेत आहे.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी एनआयआरएफ- २०२३ रँकिंग जाहीर केले. उच्च शिक्षण विभाग तसेच शिक्षण मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते. एनआयआरएफ ची सुरूवात २०१६ मध्ये झाली असून यावर्षी २०२३ मध्ये ८ हजार ६८६ शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला हाेता. तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मद्रासने ओव्हरऑल रँकिंगमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर विद्यापीठाच्या गटात बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिल्या स्थानी आहे. देशातील शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत पुणे विद्यापीठाची पिछेहाट झाली असली तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक टिकवून ठेवला आहे. नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण तसेच ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण मिळाले आहेत.
शैक्षणिक संस्थांची रॅंकिंग ठरविताना देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, दंत वैद्यकीय, विधी, वास्तुविद्या आणि कृषी असे एकूण १२ गट केले आहेत.