NIRF Ranking मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १२ व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:18 PM2022-07-15T20:18:32+5:302022-07-15T20:18:48+5:30

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क' कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर

Savitribai Phule Pune University ranks 12th in the country in NIRF Ranking | NIRF Ranking मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १२ व्या स्थानी

NIRF Ranking मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १२ व्या स्थानी

googlenewsNext

पुणे : राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क' २०२२ ची क्रमवारी जाहीर झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठांच्या क्रमवारीत बाराव्या स्थानावर आहे. 

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क' कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. १५  जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही क्रमवारी जाहीर केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे गेली काही वर्षे सातत्याने वरच्या क्रमांकावर असून राज्यातून देशपातळीवर आघाडीवर असणारे राज्यातील पाहिले सार्वजनिक विद्यापीठ आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण गुण ५९.४८ असून मागील वर्षी ही गुणाची आकडेवारी ५८.३४ होती. महाराष्ट्रात २०२० व २०२१ मध्ये कोविड १९ ची दुसरी लाट असतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपली संशोधनातील गुणवत्ता, उद्योग आणि शिक्षण सहकार्य, विदयार्थ्यांना रोजगाराच्या संधी तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

एकूण क्रमवारीत जरी आपण बाराव्या स्थानी असलो तरीही सार्वजनिक विद्यापीठ स्तरावरील आपले दुसऱ्या क्रमांकाचे स्थान, राज्यातील पहिले स्थान पूर्वीप्रमाणेच आहे. कोरोनामुळे आपली राज्याबाहेरील व परदेशी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर हलल्याने एकत्रित गुणांमध्ये फरक पडलेला दिसतो. परंतु मला आशा आहे की आपण आधीच्या क्रमावारीच्याही पुढे जात पुढील काळात आणखीन चांगले काम करू. - डॉ.कारभारी काळे (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) 

या रँकिंगमध्ये सार्वजनिक विद्यापीठात महाराष्ट्रातील आपले प्रथम स्थान अढळ आहे. मात्र राज्य विद्यापीठ म्हणून आपल्या काही मर्यादा असल्याने परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कलकत्त्याचे जाधवपुर विद्यापीठ हे सार्वजनिक विद्यापीठात देशात प्रथम आहे. मात्र तेथे केवळ शिक्षकांची संख्या १२०० आहे तर आपल्याकडे मंजूर शिक्षक ३६८ असून त्यातील ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे भविष्यात आपले स्थान कायम ठेवायचे असेल तर राज्य सरकारचे सहकार्य गरजेचे आहे. - डॉ.संजीव सोनवणे (प्र - कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) 

Web Title: Savitribai Phule Pune University ranks 12th in the country in NIRF Ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.