सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सत्रपूर्तता संपलेल्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:48 AM2018-09-24T04:48:46+5:302018-09-24T04:48:58+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमधील ज्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता पूर्ण झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून या शैक्षणिक वर्षामध्ये (२०१८-२०१९) परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमधील ज्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता पूर्ण झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून या शैक्षणिक वर्षामध्ये (२०१८-२०१९) परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. त्यांना येत्या २४ सप्टेंबरपासून परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएसस्सी, बीकॉम, बीसीए, इंजिनिअरींग आदी सर्व विद्याशाखांचे जे विद्यार्थी २००८ पॅटर्नचे आहेत; मात्र अद्याप काही विषय उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांना यंदाच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. सिनेट सदस्य अभिषेक बोके, संतोष ढोरे यांनी कुलगुरूंनी हा निर्णय बदलावा, यासाठी वारंवार निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर अखेर सत्रपूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी परीक्षा देण्याची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ही विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी असणार आहे.
विद्यार्थ्यांकडून याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. ही शेवटची संधी असून ते पुन्हा पुढच्या वर्षी आणखी मुदतवाढीची मागणी करणार नाहीत, असे त्यांना लिहून द्यावे लागेल.
सत्रपूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पहिल्या वर्षीपासून प्रवेश घ्यावा लागणार असल्याने त्यांच्यामध्ये मोठी नाराजीची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा १५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे.